Narayan Rane Sarkarnama
कोकण

Narayan Rane : भाजप नेते म्हणतात महाराष्ट्रात 45+ जागा जिंकणार; राणे म्हणतात ‘नो कॉमेंटस’

Vijaykumar Dudhale

Sindhudurg, 01 June : महायुतीच्या विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून महाराष्ट्रात ४५+ जागा जिंकण्याची भाषा केली जात असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मात्र महाराष्ट्रातील ४८ पैकी किती जागा महायुतीच्या येतील, यावर ‘नो कॉमेंट्स’ असं उत्तर दिलं आहे. तसेच, सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून मला विजयाची शंभर टक्के खात्री आहे, असा दावाही राणेंनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत (Lok Sabha Election Result) मला अजिबात धाकधूक वाटत नाही. कारण मीच विजयी होणार आहे. मला विजयाची 100 टक्के खात्री आहे. कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारीही केली आहे, असेही नारायण राणे (Narayan Rane) यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतदानानंतर येणारे एक्झिट पोल मी पाहत नाही. आम्ही पाच-पन्नास वर्षे राजकारणात घालवली आहेत, आमचे पण काही अंदाज आहेत. आम्हीही निवडणूक लढवलीय. आम्ही निवडणुकीत नामधारी नाही, तर सक्रिय होतो, अशी प्रतिक्रिया एक्झिट पोलवर नारायण राणे यांनी दिली.

राणे म्हणाले, काँग्रेसची सत्ता येत नसल्यानेच ते एक्झिट पोलच्या विश्लेषणात सहभागी होणार नाहीत. राहुल गांधी यांच्या प्रखाराच्या भाषणात महिलांना एक लाख रुपये देणार असे सांगत होते. गेली 60 ते 65 वर्षे सत्तेत होते, तेव्हा काही दिलं नाही. आता तर त्यांना कळून चुकलं ते सत्तेत येत नाहीत, त्यामुळे अशा घोषणा केल्या जातात.

इंडिया आघाडीचा पंतप्रधानच होणार नाही, त्यामुळे ते जाहीर काय करणार, असा सवाल राणेंनी इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर उपस्थित केला आहे. आमचे पंतप्रधान ठरले आहेत. त्यांचे ठरायचे आहेत. एक ना धड भाराभर चिंध्या अशी इंडिया आघाडीची स्थिती असल्याची टीकाही राणेंनी केली.

महायुतीत कोणताही विवाद नाही. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आपलं मत मांडलं आहे. त्यांचे वरिष्ठ त्यांच्याशी बोलत आहेत. तसेच, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत आहे. कोणी बोलून काही होत नाही. भुजबळ महायुतीतील मंत्री आहेत. एखादी जनहिताची गोष्ट केंद्राकडे कशी आणि कुठं बोलावी, हे त्यांना माहिती आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांच्या कांदा प्रश्नावर नारायण राणे यांनी दिली.

निरंजन डावखरे महायुतीचे उमेदवार असतील

कोकण पदवीधर मतदारसंघावरून महायुती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात खडाखडी सुरू आहे. त्यावर भाष्य करताना राणेंनी ‘महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे असल्याचं पक्षाकडून सांगितलं जाईल. बाकी कोणाचे कोण आहेत, याची माहिती माझ्याजवळ नाही, असे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT