Yunus Sheikh Join Shivsena; AIMIM corporator Sahar Shaikh Sarkarnama
कोकण

Thane Politics : ‘कैसे हराया’ फेम सहर शेखच्या वडिलांच्या शिवसेना प्रवेश? भाजप मंत्री चांगलाच भडकला; युनूस शेख यांचा खुलासा

Nitesh Rane Statement on Yunus Sheikh Shivsena Politicsl Entry : कैसे हरायाssssss फेम सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Aslam Shanedivan

Sindhudurg News : महापालिका निवडणुकीच्या वेळी ‘कैसे हरायाssssss’ म्हणत चर्चेत आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यांना शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षात मोठे पद मिळाल्याचा दावाही केला जात होता. या वृत्तामुळे एमआयएमला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अशातच भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या मुद्द्यावरून शिवसेनेला डिवचले. तसेच युनूस शेख यांच्यावर टीकाही केली.

महापालिका निवडणुकीच्या वेळी ‘कैसे हरायाssssss’ म्हणत एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांतच पक्षाच्या एका कार्यक्रमात त्यांनी मुंब्र्याला ‘हिरवे करून टाकण्याबाबत’ विधान केल्याने त्या पुन्हा एकदा टीकेच्या भोवऱ्यात सापडल्या. यानंतर त्यांचे वडील युनूस शेख यांच्यावरही टीका झाली. दरम्यान, युनूस शेख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा सुरू झाली. त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसेच कळवा-मुंब्रा केबल सेनेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तिपत्रही समोर आले.

या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी युनूस शेख यांच्यावर टीका करत शिवसेनेलाही लक्ष्य केले. “हिंदूराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघणारे हे सर्व जिहादी मानसिकतेचे लोक आहेत. त्यांना कोणीही बळ देऊ नये. कारण सापाला आपण दूध पाजत नाही.

“उद्या हे कुठेही असले, तरी त्यांच्या डोक्यातून जिहाद जाणार नाही. आपल्या स्वतःच्या मुलीला त्यांनी काय शिकवण दिली, हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा शिवसेना पक्ष आहे. मला विश्वास आहे की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बाबतीत पुनर्विचार करतील आणि त्या घाणीला आपल्या पक्षातून बाहेर काढतील,” असे राणे म्हणाले.

एकीकडे युनूस शेख यांच्या कथित शिवसेना प्रवेशामुळे ठाण्यातील राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, आता स्वतः युनूस शेख यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे वृत्त फेटाळून लावले असून, “मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही,” असे स्पष्ट केले आहे.

विरोधकांकडून अफवा पसरवल्या जात असून, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचेही युनूस शेख यांनी सांगितले. “माझा गेल्या ४० वर्षांपासून केबलचा व्यवसाय आहे. ‘अखिल भारतीय केबल सेना’ असे या संघटनेचे नाव असून, मी या संघटनेचा सदस्य आहे. ही केबल सेना शिंदे यांच्या शिवसेनेच्या अखत्यारित येते.

याच संघटनेत कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली आहे. “मात्र, अध्यक्ष झालो असलो, तरी मी शिंदे यांच्या शिवसेनेचा भाग नाही,” असे युनूस शेख यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत पसरलेल्या वृत्तावर त्यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT