

Mumbai News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येनं राजकीय क्षेत्र पूर्णेपणे हादरलं आहे. या हत्येप्रकरणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नगरसेविका आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदेंच या हत्येमागचे सूत्रधार असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार करण्यात येत आहे. याचदरम्यान, ठाण्यातील एकनाथ शिंदेंच्या वर्चस्व संपवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी थेट गणेश नाईकांनाच मोठं आवाहन केलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शुक्रवारी (ता.2 ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत भाजप नेते गणेश नाईकांना मोठं आवाहन केलं होतं. त्यांनी कार्यकर्त्याचा खून झाल्यानंतरही नाईक गप्प का? असा सवाल उपस्थित केला होता. गणेश नाईकांना ठाण्यामध्ये जा, पूर्णेकरांच्या घरी त्यांच्या कुटुंबाचा, आक्रोश पाहा, असं राऊतांनी म्हटलं होतं.
खासदार संजय राऊत गणेश नाईकांना म्हणाले, ठाण्याचं नेतृत्व करा.या गुंडगिरीविरोधात एक मोठी मोहीम उभी करा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. गणेश नाईक या गुंडगिरीविरोधात बोलताहेत,अगदी प्रखरतेनं बोलताहेत. पण आता एका राजकीय कार्यकर्त्याचा खून झाला आहे. नाईक गप्प का आहेत? त्यांनी पुढे आलं पाहिजं असंही राऊतांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊतांनी आवाहन केलं होतं. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक गणेश नाईकांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवंगत विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली.
तसेच गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबियांचं सांत्वनही केलं.त्यावेळी नाईकांनी राजकीय संघर्ष असावा पण जीव घेणारा नसावा असंही नाईकांनी म्हटलं आहे. सूत्रधार असतील तर त्यांना शिक्षा होईल असा विश्वासही नाईकांनी पूर्णेकर कुटुंबाला दिला. तसेच पूर्णेकर हे कोणत्या पक्षाचा होता यापेक्षा तो इथला सामाजिक कार्यकर्ता होता. अनिष्ट गोष्टींविरोधात आंदोलन करणं, अनिष्ट विचारांविरोधात संघर्ष करणं ही अशाप्रकारची त्याच्या जीवनाची प्राणाभिज्ञा होती असं गणेश नाईक म्हणाले.
आता याप्रकरणात ज्याकाही गोष्टी समोर येताहेत, पूर्णेकरांच्या कुटुंबियांनीही त्यांच्या भूमिका मांडल्या आहेत. पोलिसांनीही त्यांचं काम केलं आहे. बरेच घटक अटक झाले आहेत खोलवर तपास होईल. कुठल्याही प्रकारे या प्रकरणाच्या तपासात कोणतीही कसूर राहणार नाही,खऱ्या गुन्हेगारांना सजा व्हावी या विचारांचं शासन आहे, असंही नाईक यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळीच थेट एकनाथ शिंदेंचे कट्टर राजकीय विरोधक राहिलेल्या गणेश नाईक यांनाच ठाण्याचं नेतृत्व करण्याचं आवाहन केलं. संजय राऊतांनी ठाण्याच्या नेतृत्वाचा मुद्दा काढताच भाजपच्या गणेश नाईकांनीही तत्काळ ठाणे गाठत पूर्णेकर कुटुंबाची भेट घेतली आहे.
एकीकडे पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांवर गंभीर आरोप केले जात आहे. त्याचवेळी ठाकरेंच्या शिलेदारानं एकप्रकारे ठाण्यातील शिंदेंची ताकद मोडीत काढण्यासाठी नाईकांच्या रुपानं नवा राजकीय डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.