Nitesh Rane  sarkarnama
कोकण

नितेश राणेंच्या अडचणी संपेनात; सरकारी वकिलांची सही नसल्याचा बसला फटका

संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या जामिनावर आज निर्णय होऊ शकला नाही. या प्रकरणी पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला होणार आहे. विशेष सरकारी वकिलांनी ही सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांसमोर घेण्याची मागणी केली होती. परंतु, हा अर्ज परिपूर्ण नसल्याने अखेर राणेंच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांऐवजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात घ्यावी, अशी मागणी केली होती. यासाठी त्यांनी अर्जही केला होता. ई-मेलद्वारे हा अर्ज करण्यात आला होता. त्यावर घरत यांची स्वाक्षरी नव्हती तसेच, तो विहित नमुन्यातही नव्हता. यामुळे हा अर्ज फेटाळावा, अशी मागणी राणेंचे वकील सतीश मानेशिंदे आणि संग्राम देसाई यांनी केली.

यावर घरत यांना सायंकाळी 4 वाजेपर्यंत परिपूर्ण अर्ज करण्यासाठी मुदत न्यायालयाकडून देण्यात आली. तरीही विशेष सरकारी वकील घरत यांनी त्यातील त्रुटी दूर केल्या नाहीत. त्यानंतर घरत यांनी हा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात दिला. यावर आता 7 फेब्रुवारीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी घरत यांना 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे.

नितेश राणे हे न्यायालयीन कोठडीत आहेत. काल (ता.4) रात्री त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सावंतवाडी कारागृहात न ठेवता नितेश राणेंना रुग्णालयात ठेवावे, असा अर्ज त्यांच्या वकिलांनी कालच केला होता. सावंतवाडी कारागृह अधीक्षकांकडे हा अर्ज करण्यात आला होता. राणे यांची प्रकृती बरी नसल्याचे वकिलांनी आधीच न्यायालयाला कळवले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर राणेंना जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

पोलिसांना शरण गेल्यानंतर राणेंना 2 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. राणेंच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यावर न्यायालय आता 7 फेब्रुवारीला निर्णय देणार आहे. मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नंतर प्रकटले होते आणि काही दिवस कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. नंतर सर्वोच्च न्यायालयानेही जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT