Nitesh Rane News sarkarnama
कोकण

मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर नितेश राणे 24 तासांतच शरण

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांची मुदत दिली असतानाही 24 तासांतच राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयासमोर शरण आले आहेत.

नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 24 तासांतच नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर शरण आले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) हे सुद्धा होते. आता राणेंवरील कायदेशीर कारवाई जिल्हा न्यायालयात सुरू आहे. पोलिसांकडून त्यांना अटक होण्याची कार्यवाही लवकरच होण्याची शक्यता आहे. (Nitesh Rane News)

राणे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. राणेंना राजकीय हेतूने अडकवण्यात आले आहे. त्यांना उच्च न्यायालयाने दिलेले संरक्षण दोनच दिवस बाकी राहिले आहे. त्यामुळे यावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. यावर काल (ता.27) सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांचा कालावधी दिला होता. (Nitesh Rane surrenderd before court)

मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते आता प्रकटले असून, ते दररोज कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत आहेत. या वेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले होते की, कणकवली पोलिसांनी चौकशीसाठी मला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यामुळे मी सलग तीन दिवस चौकशीसाठी हजर झालो. उद्याही मी चौकशीसाठी येणार आहे. पोलिसांच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करेन, असा शब्द मी आधीच दिला होता. त्यानुसार मी कणकवली पोलीस ठाण्यात हजर झालो. यापुढेही पोलिसांना माझी गरज लागेल, तेव्हा मी हजर होईन. (Nitesh Rane News Updates)

उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. सुरवातीला राणे यांचा अटकपूर्व जामिनावरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. तोपर्यंत राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली होती. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने 27 जानेवारीपर्यंत कायम ठेवले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने राणेंना दिलासा न दिल्याने त्यांची अटक अटळ आहे. (Nitesh Rane Case Updates)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT