भाजपच्या विधान परिषद उमेदवार यादीमुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.
ठाणे आणि कोकणात उमेदवार देत भाजपने शिंदे यांच्या प्रभावक्षेत्रात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
फडणवीसांचा हा निर्णय शिंदे गटासाठी मोठे आव्हान मानला जात असून ‘मास्टरस्ट्रोक’ म्हणून चर्चा सुरू आहे.
Mahayuti Politics News : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवारांची घोषणा करताच महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या यादीवर नजर टाकली असता भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभावक्षेत्रातच आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. ठाण्यातून माधवी नाईक तर कोकणातून प्रमोद जठार या दोन शिलेदारांचा पाच जणांच्या उमेदवारी यादीत समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे ठाण्यातून आणखी एक भाजप - आमदार विधान परिषदेवर जाणार असून ही संख्या तीनवर पोहोचणार आहे. तसेच तळकोकणात देखील भाजपचे दोन आमदार होणार आहेत. तसेच येथे भाजपचा खासदार देखील असल्याने शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांनी आव्हान निर्माण केल्याचे बोलले जात आहे. तर शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दोन उमेदवार देवून फडणवीसांनी मास्टरस्ट्रोक मारल्याची चर्चा आहे.
ठाणे आणि कोकण शिंदेंचे पारंपरिक बालेकिल्ले. या ठिकाणी भाजपने स्वतंत्र ताकद उभी करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र आहे. ठाण्यातील अॅड. माधवी नाईक यांना संधी देत भाजपने स्थानिक पातळीवर नवे समीकरण मांडले आहे. महापालिकेतील माजी नगरसेविका, सध्या प्रदेश पातळीवरील जबाबदारी सांभाळणाऱ्या नाईक या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जातात. त्यामुळे ठाण्यातील सत्तासमीकरणात भाजपचा स्वतंत्र ठसा उमटवण्याची ही सुरुवात मानली जाते आहे.
तसेच कोकणात प्रमोद जठार यांची निवडही तितकीच बोलकी ठरण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गातील राजकीय घडामोडींमध्ये अलीकडेच निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा निर्णय घेतल्याचे मानले जाते. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांच्याशी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जठार यांची एंट्री ही राजकीय संदेश देणारी आहे. यामुळे आमदार नीलेश राणे यांच्या कार्यक्षेत्रात भाजप मजबूत संघटन तयार करेल अशी चर्चा आहे.
दरम्यान, संघटनात्मक पातळीवर दीर्घकाळ काम करणाऱ्यांनाही या वेळी न्याय देण्यात आला आहे. सुनील कर्जतकर आणि संजय भेंडे यांची निवड ही त्याचाच भाग मानली जाते. पडद्यामागे रणनीती आखणारे, संघटन मजबूत करणारे चेहरे पुढे आणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'टीम बिल्डिंग 'वर भर दिल्याचे स्पष्ट होते.
विवेक कोल्हे यांची उमेदवारी ही राजकीय वचनपूर्तीचे उदाहरण ठरली. विधानसभा निवडणुकीत संधी न मिळाल्यानंतर त्यांना विधान परिषदेत पाठवण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. त्या वचनाची पूर्तता करत त्यांनी आपली राजकीय विश्वासार्हता कायम ठेवली.
ताकद दाखवण्याचा प्रयत्न
या सर्व घडामोडींमधून भाजपने महायुतीत आपली स्वतंत्र ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. विशेषतः रिर्दिच्या प्रभावक्षेत्रातच आपले उमेदवार देत भाजपने भविष्यातील राजकीय समीकरणांची बीजे पेरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी काळात ही निवडणूक केवळ विधान परिषदेपुरती मर्यादित न राहता महायुतीतील अंतर्गत शक्ती-संतुलनावरही परिणाम करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
1. या राजकीय घडामोडीचा मुख्य मुद्दा काय आहे?
भाजपने शिंदे यांच्या प्रभावक्षेत्रात उमेदवार देऊन आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
2. कोणत्या उमेदवारांचा यात समावेश आहे?
माधवी नाईक आणि प्रमोद जठार यांचा या यादीत समावेश आहे.
3. हा निर्णय महायुतीत का चर्चेत आला आहे?
यामुळे सहयोगी पक्षांमध्ये अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे.
4. फडणवीसांच्या निर्णयाला ‘मास्टरस्ट्रोक’ का म्हटले जाते?
कारण त्यांनी शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच आपले उमेदवार देऊन राजकीय समीकरण बदलण्याचा प्रयत्न केला आहे.
5. पुढे काय परिणाम होऊ शकतो?
महायुतीतील संबंधांवर परिणाम होऊन राज्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.