BJP vs Shiv Sena UBT: राज्याच्या राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष काही नवीन नाही. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर या संघर्षाची धार आणखी तीक्ष्ण झाल्याचे दिसत आहे.
महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद सर्वाधिक आमदारसंख्या असलेल्या शिवसेना ठाकरे सेनेला मिळू शकते, अशी जोरदार चर्चा रंगली होती. या पदासाठी आमदार भास्कर जाधव यांचे नाव आघाडीवर असल्याचेही बोलले जात होते.
मात्र सत्ताधारी महायुतीकडून अद्याप विरोधी पक्षनेतेपदाबाबत कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. अशातच भाजपने एक अशी चाल खेळली आहे, ज्यामुळे कोकणातील (Konkan) राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपने थेट आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयालाच लागून स्वतःचे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे.
चिपळूणमधील भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या अगदी शेजारी भाजपचे (BJP) नवीन कार्यालय सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना अक्षरशः उधाण आले आहे. विशेष म्हणजे, भास्कर जाधव हे आपल्या आक्रमक भाषणशैलीसाठी ओळखले जातात आणि भाजपवर सातत्याने हल्लाबोल करत असतात. त्यामुळे भाजपची ही रणनीती केवळ कार्यालय उघडण्यापुरती मर्यादित नसून एक स्पष्ट राजकीय संदेश असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या घडामोडीमागील संवेदनशीलता आणखी वाढवणारी बाब म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या काळात याच ठिकाणी मोठा राजकीय राडा झाला होता. भाजप नेते नीलेश राणे यांचा ताफा भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरून जात असताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्यावेळी जोरदार दगडफेक झाली होती आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या होत्या.
आता पुन्हा एकदा अशा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांची कार्यालये एकाच परिसरात, अगदी शेजारी उभी ठाकल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे भविष्यात राजकीय संवादाचे नवे मार्ग खुले होणार की कार्यकर्त्यांमधील संघर्षाला नव्याने खतपाणी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही राजकीय जाणकारांच्या मते, या नव्या समीकरणामुळे स्थानिक पोलिस यंत्रणेवरील ताण वाढू शकतो. तर काहींचे मत आहे की कट्टर विरोधक एकमेकांच्या जवळ आल्याने मतभेदांऐवजी संवादाची शक्यता निर्माण होऊ शकते.
मात्र एक गोष्ट निश्चित आहे, चिपळूणमध्ये आता शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील राजकीय ‘शेजारधर्म’ पुढे मैत्रीत बदलतो की संघर्षाच्या नव्या अध्यायाला सुरुवात करतो, याकडे संपूर्ण कोकणाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.