खोपोली नगरपरिषदेतील राष्ट्रवादी-शिवसेनेचा बालेकिल्ला आता भाजपने लक्ष्य केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक अहवाल पाहून उमेदवार निश्चित केल्याची चर्चा आहे.
या घडामोडींमुळे खोपोलीत राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.
Raigad/Khopoli News : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या खोपोली नगरपरिषद निवडणुकीचे मैदान यंदा तरी मारायचेच असा चंग बांधून भाजपने मैदानात उडी घेतली आहे. गतवेळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने तगडी फाईट दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अगदी थोडक्यात विजयी झाला होता. त्यानंतर शिवसेनेने नाट्यमयरित्या नगरसेवकांची फोडाफोडी करून उपनगराध्यक्षपद मिळविले होते. पण यंदा इथे विजय मिळवायचाच या तयारीने भाजप कामाला लागली आहे. नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे खोपोली शहराबाबत भाजपने परिस्थितीचा अहवाल पोहोचला आहे.
खोपोली नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या तिन्ही प्रमुख पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिले होते. त्यावेळी भाजपचा बोलबाला नसताना सुशिक्षित मतदारांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली होती.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने अखेरच्या टप्प्यात 761 मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. उपनगराध्यक्षपदावर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाला. यावेळी खोपोली शहरात यशवंत साबळे, अविनाश तावडे अशा मातब्बरांना पक्षात घेऊन भाजपने जोरदार मुसंडी मारत स्वतंत्र ताकद निर्माण केली आहे.
यावेळी खोपोली नगरपालिकेसाठी सर्वसाधारण आरक्षण घोषित झाले आहे. त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. विविध राजकीय पक्षांनी आपल्या गोटातून सर्वमान्य आणि प्रभावी उमेदवार निवडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या गटातून माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. खासदार सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या पाठबळामुळे त्यांचा दावा मजबूत मानला जातो.
भाजपकडून यशवंत साबळे किंवा विक्रम साबळे यांच्या नावाची चर्चा आहे. तर शेकापकडून किशोर पाटील यांची नाव आघाडीवर आहे. खोपोली संघर्ष समितीकडून पक्षनिरपेक्ष सर्वसामान्य उमेदवार दिला जाणार आहे. पण सध्यातरी जिल्ह्यातील राजकीय ताकद पाहता थेट मुख्य लढत ही राष्ट्रवादीचे डॉ. सुनील पाटील, शिवसेनेचे कुलदीपक शेंडे यांच्यातच होण्याची दाट शक्यता आहे. त्यांना भाजप उमेदवाराचे कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, शेकाप आणि इतर स्थानिक संघटनांकडूनही उमेदवार निश्चित करण्यात येणार आहेत.
1. खोपोलीत भाजपने कोणत्या कारणामुळे लक्ष केंद्रित केले आहे?
राष्ट्रवादी-शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर पकड मजबूत करण्यासाठी भाजपने येथे जोरदार तयारी केली आहे.
2. फडणवीसांनी उमेदवार ठरवला का?
होय, अहवाल पाहून फडणवीसांनी उमेदवार निश्चित केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
3. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना याचा किती फटका बसेल?
खोपोलीतील त्यांच्या परंपरागत मतदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे.
4. भाजपच्या या हालचालीमागे काय धोरण आहे?
भाजप स्थानिक पातळीवर पकड वाढवून नगरपरिषदेवर वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
5. पुढील निवडणुकीवर याचा काय परिणाम होऊ शकतो?
भाजपची उपस्थिती वाढल्यास आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.