Ratnagiri-Sindhdurg Lok Sabha Constituency Sarkarnama
कोकण

BJP-Shivsena News: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा भाजप लढवणार? तयारीही जोरात; तर शिंदेंच्या शिवसेनेत शांतता

संभाजी थोरात

Ratnagiri-Sindhdurg News: लोकसभेची निवडणूक एका वर्षावर येवून ठेपली असतानाच आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपने तर महाराष्ट्रातून 'मिशन 45' ठेवले असून हे मिशन पूर्ण करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे दौरेही त्यांना दिलेल्या मतदारसंघात वाढले आहेत. यातच आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपने जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवनसेनेच्या वाट्याला आहे. मात्र, या मतदारसंघात शिवसेनेपेक्षा भाजपानेच जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या दौऱ्याबरोबरच भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी ठेवलेल्या संपर्कामुळे भाजपच हा मतदारसंघ लढेल असे चित्र आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे नावही लोकसभेसाठी चर्चेत आहे. मात्र, त्यांच्याकडून तयारी दिसत नाही.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ भौगोलिक दृष्टया खूप मोठा आहे. या दोन्ही जिल्ह्यात संपर्क ठेवणे नेते मंडळींना आव्हानात्मक असते. हा मतदारसंघ 2009 चा अपवाद वगळता कायम शिवनसेनेचा बालेकिल्ला ठरला. दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश आमदार हे सेनेचे असतात.

मात्र, सध्या सेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवसेना बॅकफूटवर आलेली दिसत आहे. राणे कुटूंबीय भाजपात आल्यानंतर भाजपची ताकद वाढली आहे. तरीही महायुतीतून शिवसेना शिंदे गट या मतदारसंघावर दावा सांगतील, अशी शक्यता होती. काही महिन्यांपूर्वी किरण सामंत यांच नाव चर्चेतही होतं. मात्र, भाजपने तयारी सुरू केल्यानंतर शिवसेना बॅकफूटवर गेली.

खासदार विनायक राऊतांना टक्कर देण्यासाठी या दोन्ही जिल्ह्यात संपर्क असलेल्या नेत्याचा शोध सुरू झाला. निलेश राणे यांच्याकडे ती क्षमता होती, पण रत्नागिरीतील काही नेते त्यांना विरोध करतील, असे चित्र असल्याने त्यांचे विधानसभेला पुनर्वसन करणार असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे आता भाजपमधून प्रमोद जठार इच्छुक आहेत. जठार यांचा राजकारणातला अनुभव आणि दोन्ही जिल्ह्यात असलेला संपर्क हा लोकसभा निवडणुकीसाठी उपयोगी ठरेल, हे स्पष्ट आहे. त्यामुळे बूथ समिती तयार करण्यापासून सर्वच ठिकाणी भाजपने आघाडी घेतली आहे.

एकीकडे भाजप जोरदार तयारी करत असताना शिवसेना शिंदे गट मात्र, शांत दिसत आहे. तर विद्यमान खासदार विनायक राऊत यांना शिवसेना फुटल्याचा फटका सहन करावा लागणार असून खासदार राऊत यांनी संपर्क आणि विकासकामे यांच्यावर भर दिला आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT