कोकण

आशिष शेलार-प्रसाद लाड ही जोडी खासदार राऊतांचा घाम काढणार

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची भाजपकडून आशिष शेलार यांच्यावर जबाबदारी;कोकणात भाजप देणार शिवसेनेला आव्हान

सरकारनामा ब्यूरो

चिपळूण : शिवसेनेबरोबर युती होण्याची शक्यता धूसर झाल्याने भारतीय जनता पक्षाने लोकसभेची २०२४ ची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत पक्षाच्या बैठकीत १२ नेत्यांवर लोकसभा निवडणुकीची तयारी सोपविण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची सूत्रे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याकडे देण्यात आली आहेत. या दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्याकडे यापूर्वीच सोपविण्यात आल्याने लाड आणि शेलार ही जोडी शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांचा घाम काढण्याची चिन्हे आहेत. (BJP's responsibility of Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha constituency on Ashish Shelar)

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबतच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा शेलारांकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील भाजपमध्ये आमदार लाड यांच्याबरोबर शेलार यांचेही महत्त्व वाढणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी भाजपकडून माजी खासदार नीलेश राणे, प्रमोद जठार यांची नावे चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रवेशाच्या घडामोडी घडल्या नाही तर राणे किंवा जठार यांच्यापैकी एकाची उमेदवारी नक्की आहे. सध्याचे राजकारण पाहता शिवसेनेशी युती होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे, त्यामुळेच हा मतदार संघ बांधणीसाठी भाजपकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी भाजपने माजी आमदार प्रसाद लाड यांच्याकडे दिली आहे. त्यांच्या जोडीला आता आशिष शेलार यांची नियुक्ती करून भाजपने हा मतदार संघ आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे दाखवून दिले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपने आशिष शेलार यांच्याकडे दिल्यामुळे आम्हा कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. आमदार प्रसाद लाड आणि आमदार आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. संघटना बांधणीसाठी भाजपला कोकणात पोषक वातावरण आहे, त्याचा उपयोग करून घेऊ, असे भाजपचे चिपळूणचे तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर यांनी सांगितले.

शिवसेनेकडून राऊतांची उमेदवारी पक्की

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांचे सुपुत्र नीलेश राणे यांनी काँग्रेसचे खासदार म्हणून पाच वर्ष या मतदार संघाचे नेतृत्व केले. राणे वगळता सुरेश प्रभू, अनंत गीते यांनी या मतदार संघाचे दीर्घकाळ नेतृत्व केले आहे. विनायक राऊत हे या मतदार संघाचे विद्यमान खासदार आहेत. शिवसेनेकडून २०२४ च्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. भाजप त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT