कोकणातील महापालिका निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांसाठी महायुतीचा फॉर्म्युला वापरण्याची सूचना देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात एकवाक्यता नसल्याने निर्णय रखडला आहे.
Raigad News : कोकणातील महापालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं असून आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी महायुतीचा फॉर्म्युला वापरण्याची वरिष्ठ नेत्यांच्या सूचना आहे. मात्र आता या यशानंतर भाजपच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटल्याने त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तर रायगड जिल्ह्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात अद्यापही एकवाक्यता होत नाही. यामुळे होणाऱ्या विलंबाने इच्छुक उमेदवारांची घालमेल सुरू झाली असून अंतिम तोडगा कधी निघणार याकडे कार्यकर्त्यांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेंच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाले असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक निवडून आले आहेत. यानंतर आता महायुतीचा हा फॉर्म्युला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वापरण्याचा निर्णय तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी घेतला आहे. तसे आदेशही खालच्या पातळीवर देण्यात आले आहेत. पण आता अर्ज भरण्याचा आजच्या शेवटच्या दिवशीही रायगड जिल्ह्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात अद्यापही एकवाक्यता झालेली नाही. उलट महापालिका निवडणुकीतील मोठ्या यशानंतर भाजपच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटल्याचे दिसत असून त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.
दरम्यान पनवेल, उरण, पेण विधानसभेतील सगळ्या जागा भाजपला हव्या आहेत. तर अलिबाग मुरूड आणि रोहमध्ये दोन जागा अशा ५९ पैकी २४ जागांसाठी भाजपचा हट्ट असल्याचे समोर येत आहे. शिवासेनेला कर्जत, अलिबाग आणि महाड विधानसभेतील २० जागा हव्या आहेत. राष्ट्रवादीला अद्याप जागावाटवापत घेण्यात आलेले नाही. फक्त चर्चा सुरू असल्याचे कळत आहे.
या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जागावाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये पडद्यामागील चर्चा तीव्र झाल्या आहेत. मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. यामुळे इच्छुक उमेदवारांची घालमेल सुरू असून नेमकां अतिम तोडगा काय असणार, काय निघणार याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा लागला आहेत.
दरम्यान जिल्ह्यातील होवू घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी नगरपालिका निवडणुकीप्रमाणे महायुती व्हावी अशी शिवसेनेची भूमिका आहे. कळीचा मुद्दा म्हणजे नगरपालिकेवेळी भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेत युती केली होती. तर शिवसेनेला वेगळं पाडलं होतं.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी युतीबाबत सांगताना भाजपशी बोलणी सुरू असल्याचे सांगत लवकरच युतीची घोषणा होईल असे सांगितले होते. तर नगरपालिका निवडणुकी वेळी शिवसेनेचा प्रस्ताव झिडकारून लावला. याला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वितुष्टाची किनार असून आताहीतीच रणनीती आखली जात असून भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली आहेत.
तर मंत्री भरत गोगावले यांनी आमची इ्च्छा महायुती व्हावी अशी आहे. पण आता कोणी सोबत आलं तर ठीक नाही आलं तर ठीक आपण सर्वच जागा शिवसेना म्हणून लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषदेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढतील तर विरोधात शिंदेंची शिवसेना असेल असेच सध्याचे चित्र आहे.
मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार केल्यास भाजप तीन जागांवर होती. पनवेल आणि उरण या दोन तालुक्यात भाजपची ताकद निर्माण झाली. ज्यानंतर पेणचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पेण मतदारसंघात भाजपची ताकद आणखी वाढली आहे. दुसरीकडे अलिबागच्या पाटील कुटुंबातील जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील, भाचे अॅड. आस्वाद पाटील यांनीही समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे येथेही भाजपची ताकद वाढली आहे.
यावरून शिंदेंचे आमदार महेंद्र दळवी यांनी, आम्हाला आगामी निवडणुका महायुती म्हणून लढाव्यात, अशा सूचना आल्या आहेत. त्यानुसार आमचे प्रयत्न सुरू आहेत. ते आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत सुरू ठेवू. यातून काहीतरी मार्ग निघेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी देखील युतीबाबत माहिती देताना, जिल्ह्यात महायुती व्हावी, अशी आमचीही इच्छा आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.
1) कोकणातील महापालिका निवडणुकीत कोणाला यश मिळाले?
भाजपला या निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे.
2) जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कोणता फॉर्म्युला सुचवला आहे?
महायुतीचा फॉर्म्युला वापरण्याची सूचना वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली आहे.
3) रायगड जिल्ह्यात अडचण काय आहे?
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात अद्याप एकवाक्यता झालेली नाही.
4) या विलंबाचा परिणाम कोणावर होत आहे?
इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली असून कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
5) अंतिम निर्णय कधी अपेक्षित आहे?
याबाबत अद्याप ठोस तारीख जाहीर झालेली नाही, मात्र लवकरच तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.