Narayan Rane Bungalow
Narayan Rane Bungalow  sarkarnama
कोकण

नारायण राणे यांना केंद्र सरकारचा दणका! बंगल्यावर पडणार हातोडा?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना (shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) सध्या आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा धक्का बसला आहे. राणे (Narayan Rane) यांच्या कोकणातील निलरत्न या बंगल्यावर हातोडा पडण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे हा आदेश राज्य सरकार नव्हे तर केंद्र सरकारकडून (Central Government) आला आहे.

राणे यांचा मालवण जिल्ह्यातील चिवला समुद्रकिनाऱ्यावर निलरत्न हा बंगला आहे. बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली होती. ही तक्रार ऑगस्ट २०२१ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. हा राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता राणे यावर काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगरपालिकेने राणे यांच्या जुहूमधील अधिश बंगल्याला नोटीस बजावली होती. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचा पालिकेला संशय आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बंगल्याची पाहणी, मोजमाप केले जाण्याची शक्यता आहे. पालिकेच्या नोटीसनंतर राणे आक्रमक झाले होते. राणे यांनी आपल्या बंगल्यात एका इंचाचेही अनधिकृत बांधकाम नसल्याचा दावा केला होता. तर भाजप आमदार नितेश राणे यांनी पालिकेच्या नोटीसला योग्यवेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला होता.

महानगरपालिकेने जुहूतील बंगल्याच्या पाहणीसंदर्भात नोटीस बजावल्यानंतर राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर पलटवार केला होता. उद्धव ठाकरे यांनी मातोश्री-१, मातोश्री-२ बांधले, तेव्हा आम्ही काही म्हणालो का, असा सवाल केला होता. भाजप-शिवसेनेची सत्ता असताना पैसे देऊन मातोश्रीवरील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात आले, असा आरोपही केला होता. माझ्या जुहूतील बंगल्याविषयी राजकीय सूडबुद्धीने कारवाई होत आहे, असेही राणे म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT