Shivsena UBT News Sarkarnama
कोकण

shivsena UBT : २० वर्षांनंतर प्रथमच फुलले भाजपचे कमळ, सभापती ठरवणार ठाकरेंची शिवसेना

Chiplun zilla parishad panchayat samiti election : चिपळूण पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ७ जागा, शिंदेसेनेला ४, भाजपला ३ आणि ठाकरेसेनेला ४ जागा मिळाल्या आहेत.

Aslam Shanedivan

  1. तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही.

  2. चार जागा जिंकून ठाकरेसेना किंगमेकरच्या भूमिकेत आली असून सभापतीपदासाठी पाठिंबा देण्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

  3. २० वर्षांनंतर प्रथमच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत भाजपचे कमळ फुलले आहे.

Chiplun News : तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. येथे पंचायत समितीवर कोणालाही एकहाती सत्ता मिळालेली नाही. मात्र चार जागा जिंकलेला ठाकरेसेना किंगमेकरच्या भूमिकेत आहे. सभापतिपदासाठी जो पाठिंबा देईल त्याला सोबत घेऊ, अशी भूमिका आमदार शेखर निकम यांनी घेतली आहे. या निवडणुकीत खेर्डी आणि वहाळ गटात दिग्गजाना पराभवास सामोरे जावे लागले. गेल्या २० वर्षात प्रथमच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेलादेखील भाजपचे कमळ फुलले.

चिपळूण पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ७ जागा, शिंदेसेनेला ४, भाजपला ३ आणि ठाकरेसेनेला ४ जागा मिळाल्या आहेत. तालुक्यात १८ गणासाठी या निवडणुका झाल्या. मात्र तालुक्यात कोणत्याही एका राजकीय पक्षाला बहुमत मिळालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ७ जागा मिळवून मोठा पक्ष ठरला तरी त्यांना सत्ता मिळवण्यासाठी आणखी तीन जागांची आवश्यकता आहे.

चिपळूण पंचायत समितीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढली. त्याविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेची ताकद उभी होती. चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी एकहाती किल्ला लढवत पंचायत समितीच्या ७ जागा आणि जिल्हा परिषदेच्या ३ जागा निवडून आणल्या.

भाजप नेते प्रशांत यादव यांनी या निवडणुकीत भाजपचे कमळ हे चिन्ह ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले. शिवसेना भाजप युतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला स्थान दिले नाही. हीच गोष्ट भाजपला पथ्यावर पडली आणि भाजपने चिपळूण तालुक्यात जिल्हा परिषदेमध्ये खाते उघडण्याची मोहीम सुरू केली. शिंदे सेनेबरोबर जागा वाटप करताना जिल्हा परिषदेला तीन जागा पदरात पाडून घेतल्या. यातील २ जागांवर विजय मिळवला. पंचायत समितीसाठी ७ पैकी ३ जागावर भाजपचे कमळ फुलले आहे.

धक्कादायक निकाल

खेर्डी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मात्र या निवडणुकीत भाजपने त्याला सुरूंग लावला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे खेर्डी गणातून पराभूत झाले. खेर्डी गटातून दिशा दाभोळकर यांचाही मोठा पराभव झाला. तसेच वहाळ गणातील राष्ट्रवादीचे माजी सभापती सुरेश खापले आणि कोकरे गटातील उबाठाचे माजी उपसभापती संतोष चव्हाण, माजी सभापती धनश्री शिंदे, माजी सभापती पप्या चव्हाण चव्हाण पराभूत झाले.

झगडे दाम्पत्यांची कमाल

अलोरे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे उमेदवार विनया झगडे राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर विजयी झाल्या. त्यांचे पती शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख विनोद झगडे यांनी अलोरे पंचायत समिती गणातून विजय मिळवला. पती आणि पत्नी एकाचवेळी आणि एकाच निवडणुकीत विजयी संपादन करण्याची चिपळूण तालुक्याच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

चिपळूण पंचायत समितीच्या निवडणुकीत एकहाती आणि एकाकी निवडणूक लढवली. जे यश मिळाले ते मतदारांचे आहे. चिपळूण पंचायत समितीमध्ये कोणाचा सभापती बसेल याबाबत मी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहे. राष्ट्रवादीचा सभापती बसवण्यासाठी जो सहकार्य करेल त्याला आम्ही सोबत घेऊ.
शेखर निकम, आमदार, चिपळूण
चिपळूण पंचायत समितीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले. आम्ही दोघे एकत्र लढलो असतो, तर कदाचित चित्र वेगळे असते. अजूनही वेळ गेलेली नाही. राष्ट्रवादीसोबत आली तर चिपळूण पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा सभापती बसेल आणि अजित पवारांना ती श्रद्धांजली असेल.
भास्कर जाधव, आमदार उबाठा

FAQs :

1. पंचायत समितीत कोणाला स्पष्ट बहुमत मिळाले का?
नाही, कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता मिळालेली नाही.

2. ठाकरेसेनेची भूमिका काय आहे?
चार जागा जिंकून ठाकरेसेना किंगमेकरच्या भूमिकेत असून सभापतीपदासाठी पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे.

3. भाजपसाठी हा निकाल का महत्त्वाचा आहे?
गेल्या २० वर्षांत प्रथमच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत भाजपचे कमळ फुलले आहे.

4. कोणत्या गटात दिग्गजांचा पराभव झाला?
खेर्डी आणि वहाळ गटात दिग्गज उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले.

5. पुढे काय राजकीय घडामोडी होऊ शकतात?
सभापती निवडीसाठी आघाड्या आणि राजकीय चर्चांना वेग येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT