Shivsena
Shivsena  Sarkarnama
कोकण

शेकापशी ३२ वर्षे एकनिष्ठ असणाऱ्या अख्ख्या गावाने केला शिवसेनेत प्रवेश

सरकारनामा ब्यूरो

मुरुड (जि. रायगड) : गेली ३२ वर्षे शेतकरी कामगार पक्षाशी (PWP) एकनिष्ठ असणारे मुरुड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील ‘वरची वावडुंगी’ या अख्ख्या गावाने शेकापला सोडचिठ्ठी देत शिवबंधन हाती बांधले आहे. गावचा विकास होत नसल्याने ग्रामस्थांनी अलिबाग-मुरुडचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena) जाहीर प्रवेश केला आहे. हा शेकापला धक्का मानला जात आहे. (Citizens of varchi Vavdungi village join Shiv Sena)

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता गेली ३२ वर्षांपासून एकनिष्ठ असलेल्या गावाने साथ साडणे हे शेकापसाठी चिंता करायला लावणारे आहे. अख्ख्या गावाने शिवसेनेत प्रवेश केल्याने मुरुड भागात शेकापला खिंडार पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आमचा शिवसेना पक्षाबरोबर कोणत्याही संबंध नसताना शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आमच्या गावासाठी ३० लाख रुपयांची पाणी योजनेसाठी मंजूर केली आहे, त्यामुळे गावच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण गाव शिवसेनेत जाहीर प्रवेश करीत आहेत, अशी घोषणा गावचे प्रमुख, जाणकार मधुकर भुवड यांनी केली आहे.

शिवसेना प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना आमदार महेंद्र दळवी म्हणाले की, आज खऱ्या अर्थाने वरचीवाडी वावडुंगी गावाचा शिवसेनेत प्रवेश होत आहे. याचा सर्वात जास्त आनंद होत आहे. माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास येथील नागरिकांनी दाखवला. त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी ग्रामस्थांना दिला.

शिवसेना पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी, वावडुंगी ग्रामपंचायतीचे सरपंच हरिचंद्र भेकरे, उपसरपंच, दिपेश वरणकर, शिवसेना तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, उपतालुकाप्रमुख मनोज कमाने, मधुकर भुवड, नथुराम भेकरे, नितिन भुवड, प्रमोद उदेक,नमिता भेकरे, रंजना पानगळे, स्वप्नाली पानंगळे, लक्ष्मी पानंगळे, नरेश उदेक, सचिन भुवड, गोपाल उदेक, दिनेश मिणमिणे, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, शहर प्रमुख आदेश दांडेकर, शीघ्रे गावचे सरपंच संतोष पाटील, काशीद ग्रामपंचायत सदस्य संतोष राणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT