Eknath Shinde Latest News, Hitendra Thakur Latest News
Eknath Shinde Latest News, Hitendra Thakur Latest News Sarkarnama
कोकण

'अप्पा, शिकायत का मौका नही मिलेगा! दोन कट्टर विरोधक येणार एकत्र

संदीप पंडित

विरार : पालघर जिल्हा म्हणजे आमदार हिंतेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला. जिल्ह्यातील सहापैकी तीन आमदार आघाडीचे आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस एक, माकप एक आणि भाजपकडे एक जागा आहे. पण असं असलं तरी शिवसेना (Shiv Sena) म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकूर हे कट्टर विरोधक मानले जातात. प्रत्येक निवडणुकीत हा संघर्ष पाहायला मिळाला. पण आता नव्या राजकीय समीकरणांमुळं हे कट्टर विरोधक एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (CM Eknath Shinde Latest News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी विधानसभेत केलेल्या भाषणादरम्यान 'अप्पा, शिकायत का मौका तुम्हें नही मिलेगा,' अशा शब्दांत हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांना आश्वस्त केलं आहे. त्यामुळे आता हे दोन्ही नेते एकत्र येऊन जिल्ह्यात नवीन समीकरणांचा उदय होणार, या चर्चेनं जोर धरला आहे. जिल्ह्याच्या विकासाचं साकडं ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना घातलं आहे. त्यामुळे आता शिंदे यांच्या भूमिकेकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणादरम्यान आमदार हितेंद्र ठाकूर यांचा अप्पा असा उल्लेख केला. तर क्षितिज ठाकूरआणि राजेश पाटील यांची उपस्थितीही अधोरेखित केली. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासून ठाकूर व शिंदे यांच्यातील वैर वाढले होते. एकनाथ शिंदे यांना लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. या निवडणुकीत युतीचे उमेदवार असलेल्या राजेंद्र गावित यांच्या समोर बविआच्या बळीराम जाधव यांचे आव्हान होते.

या निवडणुकीत शिंदे यांनी गावित यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. बहुजन विकास आघाडीचे शिट्टी हे निवडणूक चिन्ह गोठवण्यापर्यंत शिंदे यांनी मजल मारली होती. याचे परिणाम म्हणून बहुजन विकास आघाडीला पराजयाचा सामना करावा लागला होता. विधानसभा निवडणुकीतही शिंदे यांनी नालासोपारा, बोईसर व वसई मतदारसंघात शिवसेनेच्या माध्यमातून आव्हान उभे केले होते.

बोईसरमध्ये आघाडीचे विलास तरे यांनाच शिवसेनेत आणले होते. तर वसईत काँग्रेसच्या विजय पाटील यांना हितेंद्र ठाकूर यांच्या समोर उभे केले होते. मात्र नालासोपारा मतदारसंघात आमदार हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितीज ठाकूर यांच्यासमोर पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना उमेदवारी देऊन कडवे आव्हान उभे केले होते. त्यामुळे क्षितिज ठाकूर यांचा विजय हितेंद्र ठाकूर यांच्याकरता स्वतःच्या विजयापेक्षा प्रतिष्टेचा होता.

बविआच्या इतिहासात प्रथमच अशी आव्हानात्मक स्थिती एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांनी उभी केल्याने ठाकूर यांची या दोघांवर प्रचंड नाराजी होती. त्यात भरीस भर म्हणून वसई-विरारच्या प्रशासकीय राजवटीत शिंदे यांनी बविआची प्रशासकाच्या माध्यमातून कोंडी केली. याच काळात बविआ आणि शिवसेनेतील दरी प्रचंड वाढली. याबाबत हितेंद्र ठाकूर यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती.

यापार्श्वभूमीवर नव्या सत्ता समीकरणात मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे बविआला कशी 'ट्रीटमेंट' देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र हे सरकार सामान्य लोकांचे सरकार असून सामान्य लोकांच्या हितासाठी काम करेल. कोणत्याही आमदाराला विकासनिधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी देऊन सर्व आमदारांची मने जिंकली आहेत. तर भाषणादरम्यान हितेंद्र ठाकूर यांचा त्यांनी 'अप्पा' असा उल्लेख करतानाच 'शिकायत का मौका तुम्हे नहीं मिलेगा, असे जाहीर आश्वासनही दिले आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील हे दोन कट्टर विरोधक एकत्र येणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT