Kokan News : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं महायुतीला न भूतो भविष्यती असं यश मिळवून दिलं होतं.पण निवडणुकीच्या निकालानंतर सरकारनं लाडकी बहिणींना एकावर एक धक्के देण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात या योजनेतील लाभार्थी महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार असल्याचं म्हटलं होतं. ते पंधराशेच ठेवले,जवळपास 40 लाख महिलांना अपात्र करण्यात आल्याचा आरोप होत आहे. अशातच आता सरकारमधील एका बड्या नेत्यानं लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana ) बंद करण्याबाबत धक्कादायक विधान करत विरोधकांना टीकेसाठी रसद पुरवली आहे.
शिवसेनेचा आक्रमक चेहरा असलेले व नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनी राजकारण तापवणाऱ्या रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. रामदास कदम म्हणाले,बजेट डोळ्यासमोर ठेवून योजना राबवाव्या लागतात. लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरू करता येतील. अंथरूण पाहून पाय पसरावे लागतात असंही त्यांनी म्हटलं आहे.
अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाही रामदास कदमांनी शेलक्या भाषेत समाचार घेतला. ते म्हणाले, ठाकरेंना आता टीका करण्याचंच काम आहे. ते भविष्यात कधीच सत्तेत येणार नाहीत. त्यांना केलेल्या कर्माची फळं भोगावी लागतील. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना किती निधी दिला हे ते सांगू शकत नाहीत. त्यांना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही,ते बजेट काय सांगणार? बजेट पक्षाचे नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.यामुळे लाडक्या बहिणींना सरकारकडून 1500 नाहीतर 2100 रुपयेच मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.त्यामुळे महिलांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
याचदरम्यान आता महायुतीतील बड्या नेत्यानंच लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरु करता येतील, असं विधान केल्यानं महिलांसह विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येण्याची शक्यता आहे.तसेच सरकारची लाडकी बहीण योजना बंद होणार का,अशी चर्चा रंगली आहे.
महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेसह अनेक योजनांना कात्री लावण्यात येणार असल्याची शंका वर्तवली जात आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या 'आनंदाचा शिधा' ही लोकप्रिय योजनाही बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.कारण नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही.त्याचमुळे फडणवीस सरकारनं या योजनेला ब्रेक लावला लावल्याची चर्चा आहे.
राज्याच्या तिजोरीत लाडकी बहीण योजनेमुळे खडखडाट असल्याची चर्चा आहे. विरोधकांकडूनही याबाबत आरोप केले जातात. पण आता आनंदाचा शिधा योजनेसाठी कुठलीही आर्थिक तरतूद सरकारकडून न करण्यात आल्यामुळे ही योजना बंद करण्यात आली की काय अशी चर्चा राज्यभरात सुरु झाली आहे.
सत्ताधारी पक्षांच्या नेतेमंडळींकडून सातत्यानं महायुती सरकार कोणत्याही योजना बंद करणार नसल्याच्या दावा करण्यात येत आहे. खुद्द फडणवीसांनीही अनेकवेळा याबाबत खुलासा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा देताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार केला होता.तसेच यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली होती.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.