Nitesh Rane News Sarkarnama
कोकण

नितेश राणेंच्या अडचणी संपेनात; जामिनासाठी पुन्हा पुढची तारीख

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी संपत नसल्याचे चित्र आहे.

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी संपत नसल्याचे चित्र आहे. त्यांच्या जामिनावरील युक्तिवाद पूर्ण झाला असून, यावर न्यायालय उद्या (ता.9) फैसला सुनावणार आहे. सर्वोच्च न्यायालयापर्यंत जामिनासाठी धाव घेणाऱ्या राणेंची अद्याप जामिनासाठी प्रतीक्षा कायम आहे. (Nitesh Rane News)

आजच्या सुनावणीला नितेश राणेंचे बंधू माजी खासदार निलेश राणे हे वकील सतीश मानेशिंदे आणि संग्राम देसाई यांच्यासह न्यायालयात हजर झाले. परब यांना गंभीर जखम झाली नसल्याचे राणेंच्या वकीलांनी सांगितले. त्यावर परब यांच्या छातीवर गंभीर जखम करुन मारण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला, असे सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले. मारेकऱ्यांनी राणेंशी संपर्क केल्यामुळे हा पूर्वनियोजित कट नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. परब यांना झालेली मारहाण सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाल्याचेही घरत यांनी स्पष्ट केले. (Santosh Parab Attack Case)

घरत म्हणाले की, मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुते हा पुण्याचा असून, त्याच्या संपर्कात नितेश राणे होते. परब यांचा फोटो सातपुतेने राणेंना पाठवल्याने हा सर्वात मोठा पुरावा आहे. हा सुपारी देऊन केलेला गुन्हा नाही का? हल्लेखोरांशी परब यांच्याशी कोणतही वैर नव्हते. कॉल डेटा रेकॉर्ड अहवालही महत्वाचा पुरावा आहे. राणे आणि सचिन सातपुते या दोघांचेही लोकेशन एकत्र कणकवलीमध्ये आढळले होते. इतर चार आरोपींप्रमाणे राणेंचाही जामीना नाकारावा.

नितेश राणेंच्या जामिनावर 5 फेब्रवारीला सुनावणी होणार होती. परंतु, त्यावेळी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांऐवजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यांनी यासाठी केलेला अर्ज परिपूर्ण नसल्याने न्यायालयाने ही सुनावणी 7 फेब्रुवारीला ठेवली होती. दरम्यान, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे काल सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे ही सुनावणी झाली नव्हती. आज राणेंच्या जामिनावर सुनावणी झाली.

पोलिसांना शरण गेल्यानंतर राणेंना 2 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. राणेंच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यावर न्यायालय आता 9 फेब्रुवारीला निर्णय देणार आहे. मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नंतर प्रकटले होते आणि काही दिवस कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. नंतर सर्वोच्च न्यायालयानेही जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले होते.

काय आहे संतोष परब हल्ला प्रकरण?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत हा प्रकार घडला होता. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक व करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी हल्ला झाला होता. परब हे दुचाकीवरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने त्यांना मागून धडक दिली होती. यानंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर दोघांनी परब यांच्यावर टोकदार हत्याराने छातीवर वार केले होते. यात परब गंभीर जखमी झाले होते. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या या हल्ल्यामुळे खळबळ उडाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT