Dapoli Politics News : काहीच दिवसांच्या आधी दापोली नगरपंचायतीच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला. यानंतर आता नगराध्यक्षांचा पदभार उपनगराध्यक्षांकडे देण्यात आला आहे. यावरून ममता मोरे यांनी जोरदार टीका केली असून उपनगराध्यक्षांना पदभार घेण्याची इतक घाई का? असा सवाल केला आहे. त्यामुळे येथील राजकीय वातावरण आता चांगलेच तापण्यास सुरूवात झाली आहे.
दापोली नगरपंचायतीमध्ये याच महिन्याच्या सुरूवातीला (ता. 5 मे) विशेष सभेत नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव संमत झाला. याची सर्व सुत्रे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हालवली होती. ज्यामुळे ममता मोरे यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गट 14, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि भारतीय जनता पक्ष 1 या स्वाभाविक संख्या बळानुसार 15 मते पडली. त्यामुळे ममता मोरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव संमत झाला. यामुळे मोरे यांना नगराध्यक्षपद सोडण्याची नामुष्की ओढवली होती.
दरम्यान आता नगराध्यक्षपदाचा पदभार उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्याकडे देण्यात आला आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून नगराध्यक्षा ममता मोरे यांनी उपनगराध्यक्षांसह शिवसेना नेते योगेश कदम यांच्यावर प्रश्नांचा भडिमारा केला आहे. ममता मोरे यांनी खालीद रखांगे यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा पदभार देणे म्हणजे कायद्याचे उल्लघंन केल्याचा दावा केला आहे.
तसेच त्यांनी, आपण अद्याप आपल्या पदाचा पदभार उपनगराध्यक्षांकडे सोपवलेला नाही. असे असताना देखील तो कसा घेतला? असा सवाल केला आहे. तसेच आपल्याविरोधात अविश्वास ठरवाच मांडला गेला नाही, पण तो पारित झाल्याचे असे भासवले जातेय. जे बेकायदेशीर आहे. याबाबत आपण नगरविकास मंत्रालयासह उच्च न्यायालयात अपील केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.
दरम्यान नगराध्यपदाबाबत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी उपनगराध्यक्षांकडे पदभार सोपवण्याचे आदेशीत केले असल्याचेही कळत आहे. मात्र आपण सध्या मुंबईत असून असे आदेश मिळालेले नाहीत. तरीही असा पद्धतीने खालीद रखांगे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार घेत खुर्चीचा ताबा घेतला. जे कायद्याला धरून नसल्याचेही ममता मोरे यांनी म्हटलं आहे.