Dabhol Nuclear Project; Sunil Tatkare  Sarkarnama
कोकण

Nuclear Project : ‘अणुऊर्जा’ला नागरिकांचा विरोध; मग कोकणात प्रदूषणकारी उद्योग नकोच, तटकरेंची दापोली प्रकल्पावर स्पष्ट भूमिका

Sunil Tatkare Supports Villagers Protest Over Dabhol Nuclear Project : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील तीन प्रकल्पावरून ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त करत प्रकल्पांविरोधात धडक मोर्चा काढला.

Aslam Shanedivan

Dabhol News : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील तीन प्रकल्पांवरून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दाभोळ अणुऊर्जा प्रकल्प, चिखलगाव येथील बॉक्साईट मायनिंग प्रकल्प आणि देवके येथील नवेनगर प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. या प्रकल्पांविरोधात ग्रामस्थांनी दापोली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली. यासंदर्भातील निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

दरम्यान, या प्रकल्पांवरून जिल्ह्यातील वातावरण तापले असतानाच रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनीही ग्रामस्थांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. दापोली येथील अणुऊर्जा प्रकल्पाला नागरिकांनी दर्शवलेल्या विरोधाला आपला पूर्णपणे पाठिंबा असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

तीन प्रकल्पांना ग्रामस्थांचा विरोध

आघारी-भिवबंदर परिसरातील औष्णिक प्रकल्प, चिखलगावमधील बॉक्साईट मायनिंग प्रकल्प आणि देवके येथील नवेनगर प्रकल्पांमुळे स्थानिक जनजीवनावर विपरीत परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

दाभोळ अणुऊर्जा प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या हरकतींची अधिकृत नोंद घेऊन पुढील प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच चिखलगाव येथील बॉक्साईट मायनिंग प्रकल्पाच्या संभाव्य पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या तिन्ही प्रकल्पांमुळे स्थानिक जनजीवनावर विपरीत परिणाम होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित मंजुरी रद्द करून हे प्रकल्प कायमस्वरूपी बंद करावेत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

‘विकासासोबत पर्यावरणाचेही रक्षण गरजेचे’

यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, एखाद्या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होतात, हे मान्य आहे. मात्र, त्याचवेळी पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे विकास आणि पर्यावरण यांची सांगड घालूनच प्रकल्प उभारले गेले पाहिजेत. दापोली येथील अणुऊर्जा प्रकल्पाला नागरिकांनी दर्शवलेल्या विरोधाला आपला पूर्णपणे पाठिंबा असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

‘कोकणात प्रदूषणकारी उद्योग नकोत’

कोकणामध्ये उद्योग जरूर यावेत; मात्र प्रदूषण करणारे किंवा रासायनिक उत्पादन करणारे प्रकल्प येथे येऊ नयेत, असेही तटकरे यांनी ठामपणे सांगितले. कोकणातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑटोमोबाईल, सर्व्हिस, टेक्सटाईल आणि आयटी यांसारख्या विविध क्षेत्रांतील उद्योगांना प्रोत्साहन देता येऊ शकते. त्यामुळे सरकारने अशा उद्योगांकडे अधिक लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कोकणातील पावसाचा मुद्दा

दरम्यान, कोकणातील पावसाच्या परिस्थितीवरही सुनील तटकरे यांनी भाष्य केले. कोकणातील काही जिल्हे आणि तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा-राजापूर, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्येही पावसाची परिस्थिती प्रतिकूल असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ एखाद्या निकषावर आधारित निर्णय न घेता संपूर्ण परिस्थितीचा सरसकट विचार करण्याची गरज असल्याचे तटकरे यांनी म्हटले.

दुबार पेरणीमुळे शेतकऱ्यांसमोर संकट

ज्या भागात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, त्या ठिकाणीही सुरुवातीला पेरणी झाल्यानंतर पावसाने मोठी दडी मारली. त्यामुळे सुरुवातीचा पेरा वाया गेला आणि अनेक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले. आता पीक हातात येण्याची वेळ आली असतानाही काही भागांत पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी तटकरे यांनी केली.

उर्वरित शेतकऱ्यांनाही मदत देण्याची मागणी

दुष्काळी परिस्थितीत ज्या उपाययोजना केल्या जातात आणि त्याअंतर्गत शेतकऱ्यांना मदत दिली जाते, त्याच धर्तीवर पावसाच्या असमान वितरणामुळे नुकसान झालेल्या उर्वरित शेतकऱ्यांनाही मदत देण्यात यावी, असा सरकारकडे आपला आग्रह राहील, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT