Deepak Kesarkar Latest News
Deepak Kesarkar Latest News Sarkarnama
कोकण

Deepak Kesarkar : केसरकरांनी आपल्याच पदाधिकाऱ्यांना तोंडघशी पाडले; म्हणाले,भाजपसोबतचा ‘तो’ वाद गैरसमजातून!

सरकारनामा ब्यूरो

Kokan News : सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक निवडीवरून याठिकाणी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीमध्ये खडा पडला होता. मात्र, खरेदी विक्री संघात तज्ज्ञ संचालक निवडणुकीवरुन झालेला वाद हा गैरसमजातून आहे. याठिकाणी भाजप आणि ‘बाळासाहेबांची शिवसेना’युतीच आहे. त्यामुळेच झालेला गैरसमज एकत्र बसून दूर करु असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी (दि.१६) पत्रकार परिषदेत दिले.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर बोलण्याआधी आपल्याला विचारले पाहिजे होते असेही सांगून त्यांनी एक प्रकारे आपल्याच पदाधिकाऱ्यांना तोंडघशी पाडले.

मंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक निवडीवरुन झालेल्या वादावर भाष्य केलं. केसरकर म्हणाले, सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक निवडीवरून याठिकाणी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीमध्ये खडा पडला होता.

दोन्ही गटांकडून एक एक तज्ञ संचालक देण्याची मागणी बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून करण्यात आली होती. परंतु, भाजपा (BJP) ने दोन्ही तज्ञ संचालक भाजपचेच असतील, असे सांगत या निवडीत मतदान घेतले. यामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेमधील एक सदस्य भाजपाला मिळाल्याने सहा विरुद्ध नऊ अशा फरकाने भाजपाचे दोन्ही तज्ञ संचालक विराजमान झाले.

या एकूणच प्रकारानंतर निवडणुकीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोकणात झालेली भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेमधील युतीत फुट पुढे आले होते.

या सगळ्या प्रकारानंतर खरेदी विक्री संघाच्या संचालक असलेल्या अनारोजीन लोबो यांनी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन शिंदे गट संपवण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याचा आरोप केला होता. खरेदी विक्री संघामध्ये विरोधात बसूनच आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असे म्हटले होते.

खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये भाजपसोबत यतीच्या धर्म म्हणून आम्ही एकत्र आलो; परंतु निवडणूक झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रंग दाखवण्यास सुरुवात केली, असा आरोपही केला होता.

कुठलाही मतभेद नाही....

मंत्री केसरकर यांना पत्रकारांनी या विषयावर छेडले असता त्यांनी आपल्याच पदाधिकाऱ्यांना तोंडघशी पाडले. पत्रकार परिषद घेण्याआधी त्यांनी माझ्याशी बोलले पाहिजे. येथे भाजप आणि ‘बाळासाहेबांची शिवसेना’ यांच्यात कुठलाही मतभेद नाही. केवळ गैरसमजातून खरेदी-विक्री संघामध्ये काही प्रकार घडले. मला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा फोन आला. त्यामुळे आम्ही एकत्र बसून हा गैरसमज दूर करू, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT