Agasan Crime News Sarkarnama
कोकण

Agasan Crime News : आगासन गावात 8 ते 10 दरोडेखोरांचा धुमाकूळ; तुकाराम मुंडे यांच्या घरावर सशस्त्र दरोडा

Diva Crime News : दिव्यातील आगासन गावात मध्यरात्री ८ ते १० दरोडेखोरांनी एका घरात घुसून दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली असून चोरट्यांनी घरातील अडीच तोळे सोने आणि सुमारे 80 हजार रुपयांची रोकड लंपास केली.

Aslam Shanedivan

Thane News : दिवा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिव्यातील आगासन गावात मध्यरात्री ८ ते १० दरोडेखोरांनी एका घरात घुसून दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अडीच तोळे सोने आणि सुमारे ८० हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. एवढेच नव्हे, तर घरमालक तुकाराम सत्यवान मुंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आगासनसह दिवा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगासन गावातील तुकाराम सत्यवान मुंडे यांच्या त्रिनेत्र बंगल्यात रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास ८ ते १० दरोडेखोरांनी प्रवेश केला. घरात घुसल्यानंतर त्यांनी चोरी करण्यास सुरुवात केली. यावेळी घरमालक तुकाराम मुंडे यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने आजूबाजूच्या नागरिकांना फोन करून घटनेची माहिती दिली.

मुंडे यांच्या फोननंतर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्यांच्या बंगल्याजवळ जमा झाले. नागरिकांची गर्दी वाढत असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, तोपर्यंत चोरट्यांनी घरातील अडीच तोळे सोने आणि सुमारे ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली होती.

घरातील कर्मचाऱ्याला चाकूचा धाक

दरोड्याच्या वेळी घरात काम करणारे संतोष खंडू शेडगे (वय ५५) हे हॉलमध्ये झोपले होते. घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. तसेच कोणताही आवाज न करण्याची आणि गप्प राहण्याची धमकी दिल्याची माहिती आहे. दरम्यान, तुकाराम मुंडे यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंब्रा पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली. तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची तपासणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. दरोडेखोरांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दिव्यात स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी पुन्हा चर्चेत

आगासन येथील दरोड्याच्या घटनेनंतर दिवा शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दिवा परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, अद्याप या मागणीला मूर्त स्वरूप मिळालेले नाही. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, नागरीकरण आणि वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. दिवा परिसरात घरफोड्या, चोऱ्या, दरोडे आणि सायबर गुन्ह्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच नुकतेच ठाणे पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्याची घटना समोर आली होती. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रोहिदास मुंडे यांचा प्रशासनाला सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी या घटनांवरून प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलीस आयुक्तांचेच डिजिटल खाते सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेची हमी कोण देणार, असा सवाल त्यांनी केला आहे. दिवा शहराची वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे नागरीकरण आणि गुन्हेगारीच्या घटनांची गंभीरता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आगासन येथील दरोड्याची गंभीर दखल घेऊन आरोपींना तातडीने अटक करावी, दिवा परिसरातील रात्रीची पोलीस गस्त वाढवावी आणि दिवा शहरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करून ते लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी ॲड. रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT