ठाणे आणि पालघर जिल्हा परिषद निवडणुकांसाठी योगेश कदम यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
शिवसेनेची निवडणूक रणनीती मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
Thane ZP Election Yogesh Kadam Politics : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काहीच दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यांनी ‘हट्ट केला असता तर कॅबिनेट मंत्रिपद मिळालं असतं’, असे म्हटले होते. यानंतर आता त्यांचा पक्षात दबदबा निर्माण झाल्याचे संकेत मिळत असतानाच त्यांना उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी दिली आहे.
त्यांच्यावर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे आता शिंदे यांनी आगामी ZP साठी गेअर बदलला असून ठाणे जिल्ह्याकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. तर कदम यांच्या खांद्यावर ठाणे आणि पालघर या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात भाजप नेते तथा वन मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात वाद होताना दिसत आहे. गणेश नाईक यांनी तर शिंदेंचा टांगा पलटी करू असे म्हणत श्रीकांत शिंदे यांना माजी मंत्री करू असा इशारा दिला होता. ज्यानंतर ठाणे महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड येथे शिवसेनेचे मजबूत अस्तित्व असतानाही म्हणावे तसे यश मिळाले नाही. शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष दिसून उपाळून आला. तर अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेत भाजपचा नगराध्यक्ष झाला. शिवसेनेचे नगरसेवक संख्याबळ जरी जास्त असले तरी नगराध्यक्ष पदाने सेनेला हुलकावणी दिली.
यामुळेच असे चित्र पुन्हा तयार होऊ नये म्हणून ठाण्यासह रखडलेल्या इतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना अलर्ट मोडवर आली आहे. याच अनुशंगाने पक्षाने “संपर्क मंत्री अभियान” राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तर शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी मंगळवारी (ता.२१) याबाबत बैठक देखील पार पडली आहे. याच बैठकीत राज्यातील २२ जिल्ह्यांसाठी रणनीती आखण्यात आली असून संपर्क मंत्री १२ मंत्र्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
दोन महिन्यांच्या आधीच राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या.ज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिंदेची शिवसेना दुसर्या क्रमांकावर राहिली आहे. यानंतरच पक्षाने संपूर्ण राज्यात संपर्क अभियान हाती पक्ष बांधणीचा कार्यक्रम सुरू केला आहे. तर ठाणे या कार्यक्रमात केंद्रबिंदू राहिला आहे. येथून रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान ठाण्यात पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबर स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय, इच्छुक उमेदवारांची चाचपणी आणि निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवण्याचे काम योगेश कदम यांना करावे लागणार आहे. याबाबत तशा सूचना कदम यांना शिंदेंकडून मिळाल्या आहेत. या प्रमाणे आता योगेश कदम यांच्याकडून ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, गाव आणि गण पातळीवर शिवसेनेची पकड अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
एकीकडे आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक नेतृत्व आणि संघटन यांचा समन्वय साधण्याची जबाबदारी योगेश कदम यांच्याकडे दिली आहे. तरी श्रीकांत शिंदे ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या प्रभाव पट्ट्याच विशेष लक्ष घालतील. हा फक्त एका रणनीतीचा भाग मानला जात आहे.
1. ठाणे जिल्हा निवडणुकीची जबाबदारी कोणाकडे देण्यात आली आहे?
योगेश कदम यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
2. हा निर्णय कोणी घेतला?
शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला.
3. कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे?
ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश आहे.
4. योगेश कदम कोण आहेत?
ते गृहराज्यमंत्री असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
5. या निर्णयाचे राजकीय महत्त्व काय आहे?
ठाणे हा शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने निवडणुकीत पक्ष मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.