Anant Geete Sarkarnama
कोकण

पवारांवर टीका करणाऱ्या गीतेंना शिवसेनेनं दाखवून दिली 'जागा'

शरद पवार यांना कोणी जाणता राजा म्हणो किंवा आणखी काही म्हणो पण आमचे नेते ते होऊच शकत नाही, अशी टीका अनंत गीते यांनी केली होती.

सरकारनामा ब्युरो

रायगड : शरद पवार (Sharad Pawar) यांना कोणी जाणता राजा म्हणो किंवा आणखी काही म्हणो पण आमचे नेते ते होऊच शकत नाही, अशी टीका करणारे माजी खासदार अनंत गीते (Anant Geete) शिवसेनेच्या निशाण्यावर आले आहेत. पवारांवर टीका केल्यानं आधीच थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नाराजी ओढवून घेतलेल्या गीतेंना आता शिवसेनेनंही जागा दाखवल्याची चर्चा कोकणात रंगली आहे.

पर्यावरण मंत्री आणि युवानेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे 30 मार्च रोजी रायगड दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी शिवसैनिकांकडून केली जात आहे. सर्व पदाधिकारी कामाला लागले असून आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर जिल्ह्यात शिवसेनेकडून (Shiv Sena) लावण्यात आले आहेत. मात्र या बॅनरवरून गीते यांचे फोटो गायब झाले आहेत. आता गीते हे शिवसैनिकांच्या विस्मरणात गेले असल्याचे चित्र तयार झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

गीते हे रायगडचे दोन वेळा आणि रत्नागिरी जिल्ह्याचे चार वेळा खासदार राहिलेले आहेत. पण त्यांना आदित्य यांच्या दौऱ्यात फारसे महत्व दिले गेले नसल्याचे सध्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्यातील विकासकामाचे भूमिपूजन आणि शिवसैनिकाशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे हे येत आहेत. लोणारे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यपीठाच्या वसतिगृह कामाचे भूमिपूजन तर दुपारी माणगाव येथे मेळावा संपन्न होणार आहे.

आदित्य यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यात लागलेल्या बॅनरवर उद्योग मंत्री सुभाष देसाई, तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत, उपनेते विनोद घोसाळकर यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना आमदार, पदाधिकारी यांचे फोटो झळकत आहेत. मात्र सहा वेळा खासदार राहिलेल्या गीते यांना कटाक्षाने बॅनरमध्ये स्थान देण्यास टाळल्याचे दिसते. बॅनरवरील मजकूर हा वरिष्ठ पातळीवरून आल्याने त्यात गीतेंचा फोटो घेतलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गीतेंवर शिवसेनेची खप्पामर्जी झाल्याची चर्चा आहे.

Aditya Thackeray In Raigad

गीतेंकडून पवारांवर टीका

अनंत गीते हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे याच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले. यामुळे गीते हे पक्षनेतृत्वावर नाराज होते. माणगाव मेळाव्यातही गीते यांनी आपला संताप व्यक्त केला होता. शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. पवार यांना कोणी जाणता राजा म्हणो किंवा आणखी काही म्हणो पण आमचे नेते ते होऊच शकत नाही. ही सत्तेची तडजोड आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे. ज्या दिवशी तुटेल त्यादिवशी तटकरेंच्या घरी जाणार आहात का. आपल्याच घरी, शिवसेनेच्या घरी येणार आहात ना, अशी टीका गीते यांनी केली होती. त्याबाबत गीते यांना शिवसेना नेतृत्वाकडून समज देण्यात आल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर झालेल्या दसऱ्या मेळाव्यालाही ते व्यासपीठावर उपस्थित नव्हते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT