Sanjay Kadam-Sunil Tatkare-Aditi Tatkare
Sanjay Kadam-Sunil Tatkare-Aditi Tatkare Sarkarnama
कोकण

एकाच घरात खासदार, आमदार अन्‌ मंत्रिपदही : राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा तटकरे कुटुंबीयांवर हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

चिपळूण (जि. रत्नागिरी) : एकाच घरात खासदारकी, आमदारकी, मंत्री अशी तीन पदे आहेत, अशी टीका करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी भर बैठकीत तटकरे कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले. पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच टीका केल्याने बैठकीचा नूरच पालटला. माजी आमदार कदम यांच्या या कृतीमुळे कार्यकर्ते अवाक्‌ झाले. याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Former MLA Sanjay Kadam criticizes MP Sunil Tatkare)

रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मुंबईत बैठक झाली. या वेळी खासदार सुनील तटकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, माजी आमदार रमेश कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, महिला आघाडीच्या रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, प्रांतिक सदस्य बाप्पा सावंत, युवती जिल्हाध्यक्षा दिशा दाभोळकर, अजय बिरवटकर, योगेश शिर्के आदी उपस्थित होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक सावर्डे येथे झाली. या बैठकीतही कदम यांनी परखड भूमिका मांडत खळबळ उडवून दिली होती.

या बैठकीत माजी आमदार संजय कदम म्हणाले की, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव सर्वांपर्यंत पोचत नाहीत. रत्नागिरीसाठी तीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक करण्यात यावी. चिपळूण आणि खेड येथे आलेल्या पुरानंतर संपर्कमंत्री आदिती तटकरे यांचा संपर्क दौरा तब्बल ११ दिवसांनंतर झाला. संपर्कमंत्री तटकरे यांचा रत्नागिरी जिल्ह्यात संपर्कच नाही, असा हल्लाबोलही कदम यांनी यावेळी बोलताना केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याबाबत नाराजी व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष सर्वांपर्यंत पोचत नाहीत, असा मुद्दा मांडत तीन जिल्हाध्यक्ष करा, अशी मागणी माजी आमदार कदम यांनी केली होती. त्यावर खासदार सुनील तटकरे यांनी घटनेत तशी तरतूद नाही, असे सांगून तीन जिल्हाध्यक्ष निवडीचा मुद्दा फेटाळून लावला.

आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्या

निवडणुकांमध्ये आघाडीसंदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर देत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत स्पष्ट केले. आमदार शेखर निकम यांनी आदिती तटकरे यांनी सतत दौरे केले असून, भरपूर मदत पाठवली असल्याचे सांगत रत्नागिरी जिल्ह्याच्या नेतृत्वाची जबाबदारी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे द्यावी, अशी मागणी अजित पवार यांच्यासमोर केली. त्यांच्या या वक्तव्याने पक्षातील आजी माजी आमदारांमध्ये विसंवाद असल्याचे दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT