सात वर्षांची शिक्षा भोगून दिलीप भोईर दोन दिवसांपूर्वीच जामिनावर सुटले असून ते पुन्हा सक्रिय राजकारणात उतरले आहेत.
आपल्या २१ साथीदारांसह जामीन मिळताच त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभाग घेतला.
ज्यांचा विरोध त्यांनी पूर्वी केला होता, त्याच पक्षासाठी आज प्रचार करावा लागल्याने चर्चा अधिक रंगतदार झाली आहे.
Raigad News : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत मतदानापूर्वीच महायुतीचा डंका राज्यभर वाजत असून जवळपास 100 नगरसेवक आणि 6 नगराध्यक्ष भाजपचे बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे महायुतीचे मतदानाआधीच पारडे जड झाले आहे. तर आता प्रचारातही महायुतीच मुसंडी मारताना दिसत आहे. रायगडमध्ये देखील थेट लढत भाजप आघाडी आणि शेकापमध्ये होणार असून येथे प्रचारात आता रंगत येताना दिसत आहे. दरम्यान येथील प्रचारात दोन दिवसांपूर्वी सात वर्षांची शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या शिंदेंच्या नेत्याने सहभाग घेतल्याने चर्चांना उत आले आहे. तसेच अलिबागचे राजकारण ढवळून निघणार असल्याचेही येथे बोलले जात आहे.
राज्याच्या राजकारणात महायुतीत गूंड, दोन नंबर धंदेवाल्यांना थेट पक्षात प्रवेश दिला असल्याने ओरड केली जात आहे. यावरून विरोधकांकडून भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे. ही ओरड जास्तच झाली तर प्रवेश रोखले जात आहेत किंवा ते रद्द केले जात आहेत. अशातच आता रायगडमध्ये सात वर्षांची शिक्षा भोगून जामिनावर बाहेर आलेल्या एका नेत्याने थेट शिवसेनेच्या स्टेजवर हजेरी लावल्याने आता उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे अलिबागचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दोन दिवसांपूर्वीच रायगडचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर हे सात वर्षांची शिक्षा भोगून कारागृहातून जामिनावर बाहेर आले आहेत. भोईर यांच्यासह 21 जनांना जामीन मिळाला आहे. यानंतर भोईर यांनी अलिबाग नगरपालिकेच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला. त्यांनी ज्यांचा विरोध पत्करला त्यांच्याच प्रचाराला हजेरी लावली.
अलिबाग तालुक्यातील थळ येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्याला ते व्यासपीठावर उपस्थित होते. मूळ काँग्रेसमध्ये, त्यानंतर शेतकरी कामगार पक्षात आणि पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
पण भाजपने विधानसभेचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र पराभवानंतर काही महिन्यानंतर दिलीप भोईर ऊर्फ 'छोटम शेठ यांनी महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.
दरम्यान भोईर यांना न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांच्यासह 21 कार्यकर्त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यांना जेलमध्ये जावे लागले होते. दिलीप भोईर हे आदिवासी आणि कोळी समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात.
महेंद्र दळवी यांचे विशेष प्रयत्न
दिलीप भोईर यांची सुटका करण्यासाठी विशेष प्रयत्न अलिबागचे आमदार महेंद्र दळवी करत होते. त्यानंतर कारागृहातून बाहेर येताच भोईर यांनी मदतीची परतफेड करण्यासाठी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारात उडी घेतली आहे. तसेच उदय सामंत यांच्याबरोबर स्टेजवर हजेरी लावत रणनीती ही आखली. यामुळे आता रायगडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
FAQs :
1. दिलीप भोईर कोण आहेत?
ते रायगडचे माजी समाजकल्याण सभापती आणि स्थानिक राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व आहेत.
2. त्यांना शिक्षा का झाली होती?
ते एका गुन्ह्याप्रकरणी दोषी ठरले होते आणि सात वर्षांची शिक्षा भोगत होते.
3. ते जामिनावर कधी सुटले?
दोन दिवसांपूर्वीच ते जामिनावर सुटले आहेत.
4. सुटकेनंतर ते कोणत्या पक्षाचा प्रचार करत आहेत?
ते शिवसेना पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत.
5. त्यांच्या प्रचारामुळे चर्चा का रंगली आहे?
कारण त्यांनी पूर्वी त्याच पक्षाचा विरोध केला होता, आणि आता त्याच पक्षासाठी प्रचार करावा लागणे हे मोठे राजकीय वळण मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.