कोकण

जिल्हा बँकेच्या गायब अध्यक्षांना अखेर उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या (Sindhudurg District Bank Election) अध्यक्षपदी भाजपचे (BJP) मनीष दळवी (Manish Dalvi) यांची नुकतीच निवड झाली. दळवी हे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे निकटवर्तीय आहेत. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात दळवी हे आरोपी आहेत. अध्यक्ष निवडीदिवशी गायब असलेले दळवी प्रकटले होते आणि निवड होताच गायब झाले होते. आता उच्च न्यायालयाने (High Court) त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. याच प्रकरणात मनीष दळवी हे आरोपी आहेत. त्यांच्याही जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. यामुळे दळवी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नितेश राणेंना अटकेपासून संरक्षण कायम राहणार की नाही, याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयात नुकतीच पार पडली. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी व्हिक्टर डॉन्टस आणि उपाध्यक्षपदासाठी सुशांत नाईक यांनी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वंदना खरमळे यांनी काम पाहिले. अखेर राणेंच्या उमेदवारांनी यात बाजी मारली होती. उच्च न्यायालयाने दळवी यांना या निवडणुकीत उपस्थित राहून मतदान करण्याची मुभा दिली होती. त्यामुळे अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मंत्री राणे व निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्या सदिच्छा स्वीकारल्यानंतर दळवी अचानक गायब झाले होते. त्यांनी अन्य कोणाच्याही शुभेच्छा स्वीकारल्या नव्हत्या.

अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राणेंच्या दोन्ही उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा 11-7 अशा फरकाने पराभव केला. महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी व्हिक्टर डांटस यांनी अर्ज केला होता. शिवसेना आणि नारायण राणे यांच्या वादामुळे जिल्हा बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. राणेंनी जिल्हा बँकेत सत्ता मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला होता. अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होताच नारायण राणे हे जिल्हा बँकेत दाखल झाले होते. त्यांनी अध्यक्ष मनीष दळवी आणि उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे अभिनंदन केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT