Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav  Sarkarnama
कोकण

Politics : ठाकरेंनी आदेश दिला तर रत्नागिरीतून सामंतांविरोधातही लढेन : भास्कर जाधवांचे खुले आव्हान

सरकारनामा ब्यूरो

Politics : ''काही लोकांना धडा शिकवायचा आहे, तुम्ही कोणत्याही मतदारसंघातून लढा, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले तर मी लढण्यास तयार आहे'', असे सांगत ठाकरे सेनेचे नेते आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातूनही मी लढण्यास तयार असल्याचे सूतोवाच केले.

''दापोली-खेड- मंडणगडमधील आमदार हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेना पक्षाचाच असेल, त्या दृष्टीने आवश्यक बेरीज केली आहे'', असेही ते यावेळी म्हणाले. भास्कर जाधव आज रत्नागिरीत माध्यमांशी बोलत होते.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात का? असा प्रश्न त्यांना माध्यमांनी विचारला असता जाधव म्हणाले, ''गुहागर मतदारसंघ माझ्यासाठी पूर्णतः सुरक्षित आहे. तिथे कोणीही आले तरीही त्याला संधी मिळणार नाही.

मात्र, पक्षाला ज्यांनी त्रास दिला आहे त्यांना धडा शिकवायचा आहे, असे पक्षप्रमुखांना वाटत असेल तर यशापयशाची किंवा निर्णय बरा-वाईट लागेल याची चिंता न करता ते सांगतील त्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सज्ज आहे. मी लढणारा शिवसैनिक आहे. पाठीमागे हात घेऊन बसणारा नाही. जो कोणी उमेदवार समोर येईल, त्याला दे माय धरणी केल्याशिवाय राहणार नाही'', असं ते म्हणाले.

तसेच यावेळी माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) यांच्या प्रवेशाविषयी ते म्हणाले की, ''रामदास कदम यांच्याअती बोलण्यामुळे मी ठरवले आहे की, दापोली-खेडमधील पुढचा आमदार हा उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचा निवडून आणायचा. त्याची जबाबदारी घेतली असून, तेथेही बेरीज केली आहे. एखादे ऑपरेशन आम्ही असे करतो ते पूर्ण झाल्यावरच संबंधिताला कळते.

खेड, दापोली तालुक्यातील आणखीन काही कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. संजय कदमांचा प्रवेश हा त्याचाच एक भाग असून यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. ज्याचा आमदार निवडून आला त्याची ती जागा हा निकष आहे. येथून सेनेचा आमदार निवडून आल्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेचा क्लेम आहे. तरीही तशी वेळ उद्‌भवणार नाही. महाविकास आघाडीत समन्वय आहे'', असं ते यावेळी म्हणाले.

''दापोलीतील साई रिसॉर्टवरील कारवाई वैयक्तिक सुडाचाचा भाग आहे. या कारवाईमुळे सगळे व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत. आंजर्ले, केळशी परिसराचा गोव्याप्रमाणे विकास झाला आहे. कोट्यवधी रुपये कर्ज काढून मोठी हॉटेल, व्यवसाय उभारले गेले. या सगळ्यांवर हातोडा फिरण्याची भीती निर्माण झाली आहे. हजारो व्यावसायिकांना नोटीस आल्या आहेत.

किरीट सोमय्यांनी आणलेला हातोडा कोकणातील पर्यटनावर मारला होता. त्याचा त्रास व्यावसायिकांना होत आहे. ज्यांना निवडून दिले त्यांनीच या लोकांच्या पोटावर पाय आणला. रोजगार देण्याऐवजी तो मातीत घालण्याचे काम ते करत आहेत. त्याची परतफेड मतदानावेळी करतील'', असा इशारा जाधव यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT