Snehal Jagtap Vs Bharat Gogaonle Sarkarnama
कोकण

Thackeray Vs Shinde Group : गृहमंत्री फडणवीस आहेत की भरत गोगावले? ; स्नेहल जगतापांचा खोचक सवाल!

Mayur Ratnaparkhe

Mahad Shivsena News : रायगड जिल्ह्यात महाड येथे शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटी नंतर आता ठाकरे गटाच्या महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीशंकर काळे यांच्या बदलीची मागणी केली आहे.

06 जानेवारी रोजी लोणेरे येथे होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला ठाकरे गटाचा विरोध असून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून कार्यक्रम उधळून लावणार असा इशारा जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी दिला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या तापलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रायगड जिल्ह्यात महाड विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले(Bharat Gogawle) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून त्यांचा निषेध करण्यात आला आणि शिंदे सरकारचे विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

या सगळ्याला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेत विरोध दर्शवला. शुक्रवारी महाड शहरात शिंदे गटाचे कार्यकर्ते एकत्र आले होते. याचवेळी दोन्ही गटांमध्ये महाड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळालं. या सगळ्या प्रसंगाला महाड व माणगाव पोलीस यांनी एकत्रित सामोरे जात वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

आता या सगळ्या प्रकरणानंतर स्नेहल जगताप यांनी आमदार भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आहेत की भरत गोगावले? असा सवालच स्नेहल जगताप यांनी उपस्थित केला आहे. आमदार गोगावले यांच्या आदेशानुसारच पोलीस काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच पोलीस प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त करत पोलीस उपविभागीय अधिकारी काळे यांच्या बदलीची मागणी केली असून बदली होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असाही इशारा स्नेहल जगताप यांनी दिला आहे. त्यामुळे महाड येथील शिंदे व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीनंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापल्याच पाहायला मिळत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT