रत्नागिरी : पक्षप्रवेशासंदर्भात महाविकास आघाडीत अलिखित करार आहे, पण दापोलीमध्ये पक्षप्रवेश कोणाचा होणार आहे, याची मला कोणतीच माहिती नव्हती; मात्र जे राष्ट्रवादीत आले त्यांचे पूर्वीच्या पक्षात स्थानिक नेतृत्त्वाशी मतभेद होते. प्रवेश केलेल्या तिघांपैकी एका व्यक्तीला पक्षातून काढून टाकले होते, तर अन्य दोघे पक्षातून बाहेर पडलेले होते, अशी सावध भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीत कोणतीच कुरबूर नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली. (Jayant Patil Regret Bhaskar Jadhav's decision to leave the NCP)
रत्नागिरीत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावरून विचारले असता ते म्हणाले, प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु एकमेकांचे कार्यकर्ते प्रवेश करून घ्यायचे नाहीत, असे आघाडी करताना ठरलेले होते. दापोलीतील कार्यक्रमावेळी गुरुवारी (ता. २८ ऑक्टोबर) प्रवेशासाठी आलेल्यांची ओळख करून देण्यात आली. ते पक्ष नेतृत्वावर नाराज होऊन बाहेर पडलेले होते. यावरून महाविकास आघाडीमध्ये कोणतीही कुरबूर होणार नाही, तो कालचा प्रवेश होता. आज पुन्हा प्रवेश करून घेतलेले नाहीत. तीनही पक्षांत समन्वय असून मुख्यमंत्री चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रवादी एकेकाळी मजबूत होती. खेड, गुहागर, रत्नागिरीत आमदार होते. सामंत सात वर्षांपूर्वी बाहेर पडले होते. त्यांच्याविषयी आता बोलणे योग्य नाही. त्यानंतर गुहागरचे आमदार बाहेर पडले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सर्व काही दिले तरीही ते का बाहेर पडले, हा प्रश्नच आहे. भविष्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले पाहिजे, यासाठी रत्नागिरीत झालेल्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीत पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. रत्नागिरी शहराच्या अध्यक्षपदी नीलेश भोसले असून त्यांनी शहरातील पक्षीय स्थितीचा आढावा घेतला होता. प्रत्येक कार्यकर्त्यांची मते आम्ही जाणून घेतली आहेत. त्यानुसार कडक कार्यवाही होईल. मागील दौऱ्यावेळीही तालुकाध्यक्षपदाचा विषय होता, तो मार्गी लागला आहे. या वेळी घेतलेल्या आढाव्यातील प्रश्नही सुटलेले दिसतील.
आदिती तटकरेंनी लक्ष देणे अपेक्षित
सुनील तटकरे हे खासदार आहेत, त्यामुळे त्यांच्यावर मतदारसंघातील मोठी जबाबदारी आहे. ते पालकमंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्यात संपर्क ठेवून होते. मात्र, जिल्हा संपर्कमंत्री म्हणून राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे. त्याबाबत मी लवकरच सूचना करेन, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.