Kalyan News : कल्याण पश्चिमेतील उंबर्डे डम्पिंग ग्राउंडवरील सुपरवायझरला मारहाण केल्याच्या आरोपावरून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जोशी यांच्यासह तिघांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या डम्पिंग ग्राउंडवरील पाहणी दौऱ्यादरम्यान हा प्रकार घडला होता. सुपरवायझर किरण रसाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
कल्याण पश्चिमेतील उंबर्डे डम्पिंग ग्राउंड येथे भाजप आमदार सुलभा गायकवाड यांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या पाहणीदरम्यान डम्पिंग ग्राउंडवरील कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्रे नसणे, सुरक्षा साधनांचा अभाव, तसेच कचरा वेचण्याच्या कामात बालकांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय कचरा वाहून नेणाऱ्या गाडीत केवळ चालक असल्याचा मुद्दाही समोर आला. तसेच वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या आवश्यक कागदपत्रांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
या मुद्द्यांवरून आमदारांसोबत असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांचा सुपरवायझर किरण रसाळ यांच्याशी वाद झाला. भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय जोशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्रे का नाहीत, असा सवाल केला. रसाळ यांनाही याबाबत विचारणा करण्यात आली.
ते दारूच्या नशेत असल्याचा आरोपही करण्यात आला. रसाळ यांनी आपण दारू प्यायलेलो नसल्याचे सांगितल्यानंतर जोशी यांनी त्यांच्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. तसेच व्यवस्थित बोलण्यास सांगितल्याचेही समोर आले आहे. या घटनेनंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते.
सुपरवायझरच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
या मारहाण प्रकरणी सुपरवायझर किरण रसाळ यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय जोशी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्याणच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकरणात पोलीस पुढे कोणती कारवाई करतात, याकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसकडून कारवाईची मागणी
दरम्यान, या प्रकरणावरून काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली होती. मारहाणीचा आरोप असलेल्या भाजप पदाधिकाऱ्याविरोधात तातडीने कारवाई करून त्याला अटक करावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. यासंदर्भात कल्याण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली होती. कारवाई न झाल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने पोलीस पुढे काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.