Crime News  Sarkarnama
कोकण

Crime News : दारूच्या नशेत महिलेचा पोलीस ठाण्यातही राडा; महिला अधिकाऱ्याला मारहाण, पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

Sindhudurg Police Officer Assault Case : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील बाजारपेठेत पुण्यातील एका महिलेने दारू पिऊन आरडाओरड करत नागरिकांना शिवीगाळ केली. मद्यधुंद अवस्थेत तिला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिने महिला पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे.

सरकारनामा ब्युरो

Sindhudurg News : कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच पोलीस ठाण्यात मारहाण आणि धक्काबुक्की झाल्याची धक्कादायक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत बाजारपेठेत गोंधळ घालणाऱ्या एका महिलेने पोलीस ठाण्यात आणल्यानंतरही आक्रमक भूमिका कायम ठेवत प्रभारी अधिकाऱ्याच्या खांद्यावर हाताने मारल्याचा आरोप आहे.

एवढेच नव्हे, तर महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या गणवेशाची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. निशिगंधा दत्ताराम बागवे (वय अंदाजे ३०, रा. फातिमानगर, पुणे) असे संबंधित महिलेचे नाव असून, तिच्याविरुद्ध मद्यधुंद अवस्थेत कणकवली बाजारपेठेत आरडाओरड व शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ आणि तसेच पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध येथील कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल स्वप्नील ठोंबरे यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १५) ठोंबरे यांची येथील पोलिस ठाण्यात डायल ११२ ड्युटी होती. रात्री ८.५३, ८.५४ आणि ९.०३ वाजता डायल ११२ प्रणालीवर संबंधित महिलेबाबत तीन तक्रारींचे कॉल प्राप्त झाले. बाजारपेठेत एक महिला दारू पिऊन त्रास देत असून आरडाओरड करीत असल्याचे कळवून मदतीची मागणी केली होती. त्यानुसार ठोंबरे आणि ठाणे अंमलदारांचे मदतनीस पोलिस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग पांढरे यांनी ठाणे अंमलदार पोलिस हेड कॉन्स्टेबल मिलिंद देसाई यांना माहिती दिली. त्यानंतर रात्री ९.१० वाजण्याच्या सुमारास येथील बाजारपेठेतील पेट्रोलपंपाजवळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता संबंधित महिला रस्त्यावर मोठमोठ्याने आरडाओरड करीत होती. नागरिकांना शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करीत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. दरम्यान, कणकवली पोलिस ठाण्यातून महिला पोलिस कॉन्स्टेबल कविता सावंत, रेश्मा कांबळे, स्नेहल बरगे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग कळंत्रे, सागर जाधव आणि श्रीकांत कुंभार घटनास्थळी दाखल झाले.

मात्र, संबंधित महिला कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. महिला पोलिस रेश्मा कांबळे आणि स्नेहल बरगे यांनी तिला शांत राहण्यास सांगितले असता, तिने दोघींनाही अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या शासकीय गणवेशाला हात घालून धक्काबुक्की केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. या प्रकाराची माहिती कणकवली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पवार यांना देण्यात आली. तेही घटनास्थळी दाखल झाले. महिला पोलिसांच्या मदतीने तिला येथील पोलिस ठाण्यात आणले.

पोलिस ठाण्यातही गोंधळ पोलिस तिला शांत राहण्यास सांगत असताना तिने प्रभारी अधिकारी गणेश पवार यांना मारहाण केली. तसेच महिला पोलिस हवालदार स्वप्नाली तांबे यांच्या शासकीय गणवेशाची कॉलर पकडून त्यांच्याशी धक्काबुक्की केली. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण, धक्काबुक्की व शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी निशिगंधा बागवे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विनोद सुपल करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT