कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदाची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही.
बहुमत असलेल्या कर्जत परिवर्तन विकास आघाडीने राखीव पदावर महिला सदस्याला संधी देण्याची रणनीती आखल्याची चर्चा आहे.
नमिता घारे यांची गटनेते म्हणून निवड झाल्याने भविष्यातील सभापतीपदाबाबत राजकीय तर्कवितर्क वाढले आहेत.
karjat News : कर्जत पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागून आता जवळपास १० ते १२ दिवस होत आहेत. पण अद्याप येथे सभापती निवड झालेली नाही. यामुळे ती निवड कधी होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले असतानाच आता नवा मुद्दा समोर आला आहे. यामुळे सत्तेत बसलेल्या कर्जत परिवर्तन आघाडीतच आता बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात असून पुरूष सदस्य नाराज झाल्याचे बोलले जात आहे. तर याला कारण आघाडीने घेतलेला निर्णय असून सभापती पदावर तटकरेंच्या निकटवर्तीयाच्या घरातील महिलेचे चर्चेतील नाव आहे.
पंचायत समितीच्या 12 जागांसाठी निवडणूक झाली होती. ज्यात कर्जत परिवर्तन आघाडीचे 10 आणि महायुतीच दोन सदस्य निवडून आले होते. कर्जत परिवर्तन आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि ठाकरेंची शिवसेना आहे. पंचायत समिती मध्ये कर्जत परिवर्तन विकास आघाडीचाच उमेदवार सभापती होणार हे देखील नक्की झाले आहे.
सत्तेत आलेल्या आघाडीने पहिली अडीच वर्षे नागरिकांचा मागास वर्गासाठी सभापती पद जाहीर केले होते. पण आता हाच मुद्दा आघाडीसाठी डोकेदुखी ठरला आहे. येथे निवडणुकीवेळी तालुक्यातील तीन जागा नागरिकांचा मागास वर्गासाठी राखीव होत्या. पण निकालानंतर आघाडीतच तब्बल आठ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे पद एक आणि सदस्य आठ अशी स्थिती येथे निर्माण झाली आहे.
यामुळेच आता हा राजकीय पेच सोडवण्यासाठी राष्ट्रवादीने नवा डाव टाकला असून पुरूष निवडीचा पायंडाच मोडून काढण्याचे ठरवलं आहे. पंचायत समिती सभापतीपद ही नागरिकांचा मागास प्रवर्ग असे राखीव असताना महिला सदस्याला सभापती करण्याचा घाट येथे घातला जात आहे.
राष्ट्रवादीच्या या नव्या चालीमुळे आघाडीच्या नवीन पायंडा पडण्याची शक्यता असून पुरुष सदस्यांमध्ये नाराजी पसरल्याचे बोलले जात आहे. तर यामुळे सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांमध्ये धडकी भरली असून आघाडीवर दुष्परिणाम होण्याची शंका बोलून दाखवली जात आहे. आता सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी खुले असल्याने येथे महिला किंवा पुरुष कोणीही बसू शकतो. यामुळेच महिला सदस्याला या पदावर बसवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान सभापती पदासाठी आघाडीतील भगवान चंचे, महेश खारीक आणि नितीन धुळे यांची नावे चर्चेत होती. मात्र, आता तटकरे यांचे निकटवर्तीय आणि आघाडीचे सर्वेसर्वा सुधाकर घारे यांच्या पत्नी नमिता सुधाकर घारे यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने कर्जतमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. नमिता घारे या गटनेते असल्याने त्याच भावी सभापती असतील असेही आता दबक्या आवाजात चर्चा होताना दिसत आहे.
कुणबी प्रमाणपत्र
विशेष म्हणजे नमिता घारे यांचे कुणबी जातीचे ओबीसी प्रमाणपत्र असल्याने त्या नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासाठी राखीव असलेल्या सभापती पदावर दावा सांगू शकतात. पण एकीकडे पुरूषांची मक्तेदारी असताना त्यांना सभापती केल्यास पुरुष सदस्य नाराज होण्याची शक्यता आहे.
1. कर्जत पंचायत समिती सभापती निवडणूक का जाहीर झालेली नाही?
ग्रामविकास विभागाकडून अद्याप निवडणुकीची तारीख घोषित करण्यात आलेली नाही.
2. सभापती पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे?
हे पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे.
3. नमिता घारे यांचे नाव का चर्चेत आहे?
त्यांची गटनेते म्हणून निवड झाल्याने त्यांचा भावी सभापती म्हणून विचार होत असल्याची चर्चा आहे.
4. या निर्णयामुळे कोणती नाराजी निर्माण झाली आहे?
पुरुष सदस्यांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता वाढल्याची चर्चा आहे.
5. या राजकीय घडामोडींचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो?
आघाडीला अंतर्गत मतभेदांचा सामना करावा लागू शकतो आणि स्थानिक राजकारणात मोठे बदल घडू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.