Raigad News : रायगड जिल्ह्यातील भीमाशंकर आणि कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात प्रस्तावित टोरेंट ग्रीन एनर्जी प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार असल्याने पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३३ हजार झाडे तोडली जाणार आहेत. दरम्यान त्यातील हजारो झाडांची तोड झाल्याने स्थानिक नागरिकांनी विरोध सुरू केला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांपाठोपाठ आता स्थानिक भाजपनेही वृक्षतोडीऐवजी झाडांचे पुनर्रोपण करण्याची मागणी केली आहे.
“विकासाला आमचा विरोध नाही; मात्र पर्यावरणाचे नुकसान टाळून विकास व्हावा,” अशी भूमिका भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी मांडली. झाडे तोडण्याऐवजी ती मुळासकट काढून अन्य ठिकाणी लावण्याची पद्धत अवलंबावी, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चीनसारख्या देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वृक्ष प्रत्यारोपणाच्या पद्धतीचा अभ्यास करून ती येथेही राबवावी, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.
कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरेंट कंपनीचा सुमारे तीन हजार मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प प्रस्तावित आहे. हा प्रकल्प हरित ऊर्जेशी संबंधित असला, तरी त्यासाठी होणारी मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड चिंतेचा विषय ठरत आहे. पर्यावरणाचे नुकसान टाळून विकास साधण्याची गरज असल्याचे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केले.
वृक्ष प्रत्यारोपणाचा पर्याय...
भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची स्थानिक भूमिका स्पष्ट केली. अमेरिका, जपान आणि चीन यांसारख्या देशांमध्ये झाडे तोडण्याऐवजी ती मुळासकट काढून दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपित करण्याचे प्रयोग केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारे प्रत्यारोपित केलेल्या झाडांचे पुढील काही वर्षे पाणी, आवश्यक औषधोपचार आणि तज्ज्ञांच्या मदतीने संगोपन केले जाते. कर्जतमध्येही अशाच पद्धतीचा अवलंब करून वृक्षतोड टाळावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली. विकासकामांना विरोध न करता पर्यावरणाची हानी कमी करण्याचा पर्याय शोधणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ठाकरेंकडूनही वृक्षतोडीला विरोध
साई डोंगर परिसरातील वृक्षतोडीवरून राजकीय वातावरण तापले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वृक्षतोड झालेल्या ठिकाणी भेट देत विरोध दर्शवला होता. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीही या वृक्षतोडीविरोधात भूमिका घेतली आहे. टोरेंट प्रकल्पाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये मतभेद असल्याचेही दिसून येत आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र थोरवे यांचा प्रकल्पाला पाठिंबा असल्याचे सांगितले जाते, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते सुधाकर घारे यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे.
सुधाकर घारेंची आमदार महेंद्र थोरवेंवर टीका
प्रकल्पाच्या समर्थनावरून सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका केली होती. स्थानिकांच्या हितापेक्षा प्रकल्पाला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. स्थानिकांच्या जीविताला आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पांना विरोध करणे गरजेचे असल्याची भूमिका घारे यांनी मांडली होती.
दरम्यान, टोरेंट प्रकल्पाच्या वृक्षतोडीविरोधात स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि विविध राजकीय पक्षांकडून विरोध वाढत असताना भाजपनेही पुनर्रोपणाचा पर्याय पुढे केला आहे. त्यामुळे साय डोंगरातील वृक्षतोड आणि प्रस्तावित प्रकल्पाबाबतचा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.