Torrent Power Karjat Project : कर्जतमधील वृक्षतोडीवरून हंगामा : CM फडणवीसांनी सुनावलं : "फेक नॅरेटिव्ह थांबवा, 90 हजार नवीन झाडं लावणार!"

Torrent Power Karjat Hydro Project : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील टोरेंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पावरून वाद पेटला असून येथील वृक्षतोडी केली जात आहे. यावरून विरोधकांनी सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad Politics : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पासाठी 32,480 झाडे तोडली जाणार असल्याचा दावा करण्यात येत असून, पर्यावरणप्रेमी आणि विरोधकांनी यावरून राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचा दावा केला आहे. विरोधकांकडून केवळ ‘फेक नरेटिव्ह’ पसरवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी परिसरातील सायडोंगर येथे टोरंट पॉवर कंपनीचा पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी 640 एकर वनजमीन देण्यात आल्याचा आणि तब्बल 32,480 झाडे तोडली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आणि स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे वृक्षतोडीचा मुद्दा आता पर्यावरणापुरता मर्यादित न राहता राजकीय वादाचा विषय बनला आहे.

आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पावरून सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली आहे. गुजरातमधील टोरंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पासाठी सायडोंगर परिसरातील हजारो झाडांची कत्तल सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचा विरोध असताना वृक्षतोडीला परवानगी कोणाच्या दबावाखाली देण्यात आली, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. खाजगी कंपन्यांचे हित जपण्यासाठी महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा बळी दिला जात आहे का, असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: सरकारी विभागांच्या निधीला दुष्काळाचा फटका; मुख्यमंत्र्यांकडून 20 टक्के निधी कपातीच्या सूचना

राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असताना जंगलतोड करून महाराष्ट्राला वाळवंट बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी टीकाही त्यांनी केली. प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी घाई केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राज ठाकरेही कर्जतच्या दौऱ्यावर

या वृक्षतोडीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. ते येत्या 28 तारखेला कर्जत दौऱ्यावर जाणार असून, वृक्षतोड सुरू असलेल्या परिसराची पाहणी करणार आहेत. यावेळी त्यांची जाहीर सभाही होणार आहे. प्रकल्पाला स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत असताना राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे या मुद्द्याला आणखी राजकीय धार मिळण्याची शक्यता आहे. या सभेत ते कोणती भूमिका मांडतात आणि पुढील आंदोलनाबाबत काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

फडणवीसांचा पलटवार

प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प पूर्णपणे पर्यावरणपूरक असल्याचा दावा त्यांनी केला. विरोधकांकडून ‘फेक नरेटिव्ह’ पसरवण्याचे काम सुरू असून, खोटे कथानक उभे करणे म्हणजे महाराष्ट्रविरोधी कृत्य असल्याचेही ते म्हणाले. या प्रकल्पामुळे कोणाचीही उपजीविका नष्ट होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधितांच्या पुनर्वसनाचा योग्य विचार केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. हा प्रकल्प एका दिवसात मंजूर झालेला नसून, त्यासाठी 18 महिने सुनावणी झाली आहे. त्यानंतरच प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असून, संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत पार पडल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

स्वच्छ ऊर्जेची निर्मिती होणार; मुख्यमंत्र्यांचा दावा

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग येत असल्याने विजेची मागणी वाढणार आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ऊर्जानिर्मितीवर भर देण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सौरऊर्जेची व्यवस्था असली, तरी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर विजेची मागणी वाढते. त्या वेळी कोळशावर आधारित वीज वापरल्यास प्रदूषण वाढते. त्यामुळे पंप स्टोरेज प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्राला स्वच्छ ऊर्जानिर्मितीचे केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पातून तीन हजार मेगावॅट वीज निर्मिती होणार असून, ही स्वच्छ ऊर्जा असेल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. तसेच या प्रकल्पामुळे सुमारे 40 लाख वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनाइतके उत्सर्जन टाळता येईल, असेही त्यांनी सांगितले.

90 हजार झाडे लावणार

प्रकल्पासाठी घेतलेल्या जागेवर तलाव तयार करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या तलावात साठवले जाणारे पाणी सुमारे चार लाख लोकांच्या वर्षभराच्या गरजा भागवण्याइतके असेल, असा दावा त्यांनी केला. या प्रकल्पामुळे पाण्याची बचत होण्यासही मदत होऊ शकते, असे ते म्हणाले. कंपनीने प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनीच्या बदल्यात तीनपट जागा उपलब्ध करून दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्या जागेवर 30 हजार आणि प्रकल्पाच्या जागेवर 60 हजार अशी एकूण 90 हजार झाडे लावण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला. हा प्रकल्प भीमाशंकर जंगलापासून 16 किलोमीटर आणि मंदिरापासून 20 किलोमीटर अंतरावर असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले. प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: जरांगेंनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपबाबत CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; शिवसेनेच्या शिष्टमंडळाला काय दिलं आश्वासन?

दरम्यान, प्रकल्पामुळे होणारे पर्यावरणीय परिणाम, वृक्षतोडीची परवानगी, स्थानिकांचा सहभाग आणि पुनर्वनीकरणाच्या दाव्यांबाबत अधिकृत कागदपत्रांमधून स्पष्टता येणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकीकडे सरकार हा प्रकल्प स्वच्छ ऊर्जेसाठी महत्त्वाचा असल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे विरोधक आणि पर्यावरणप्रेमी वृक्षतोडीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे कर्जत प्रकल्पावरून सुरू असलेला संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com