BJP Sarkarnama
कोकण

BJP Setback : टोरंट प्रकल्प भाजपच्या अंगलट? रायगडमध्ये राजीनामासत्र; आणखी एका बड्या पदाधिकाऱ्याचा पक्षाला रामराम

BJP Leader Quits Over Karjat Torrent Project Tree Cutting : कर्जत तालुक्यातील पाली-सायडोंगर परिसरातील प्रस्तावित टोरंट पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाच्या वृक्षतोडीवरून राजकारण चांगलेच तापले असून याचा फटका सत्ताधारी भाजपला स्थानिक पातळीवर बसत आहे.

Aslam Shanedivan

Raigad News : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरंट पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाच्या वृक्षतोडीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाला भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी विरोध दर्शविला असून, शिंदेंच्या शिवसेनेकडून मात्र प्रकल्पाला पाठिंबा दिला जात आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही या प्रकल्पावरून नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. आता या नाराजीचे पडसाद थेट भाजपमध्ये उमटू लागले असून पक्षात राजीनामासत्र सुरू झाले आहे. उत्तर रायगड किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जनार्दन म्हसकर यांनी वृक्षतोडीविरोधात भूमिका घेत भाजपच्या पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रायगडमधील भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

टोरंट प्रकल्पावरून भाजपमध्ये नाराजी; आधी दोघांचे राजीनामे

कर्जत तालुक्यातील पाली-सायडोंगर परिसरात टोरंट कंपनीचा पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असून, त्यामुळे सह्याद्रीच्या जंगलांचे आणि पर्यावरणाचे नुकसान होण्याची भीती स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

या प्रकल्पावरून भाजपमधील नाराजी यापूर्वीही समोर आली होती. पर्यावरणाचा ऱ्हास आणि सह्याद्रीच्या जंगलांचे संभाव्य नुकसान याविरोधात भूमिका घेत भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ऋषिकेश जोशी आणि कर्जत तालुका चिटणीस मिनेश मसणे यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यांची चर्चा सुरू असतानाच आता भाजपला आणखी एक धक्का बसला आहे.

जनार्दन म्हसकर यांचा भाजपला रामराम

उत्तर रायगड किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जनार्दन म्हसकर यांनी रविवारी (ता. १५) भाजपच्या पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. कर्जत तालुक्यातील पाली-सायडोंगर परिसरात प्रस्तावित असलेल्या टोरंट कंपनीच्या पंप स्टोरेज प्रकल्पामुळे संभाव्य जंगलतोड आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

म्हसकर यांनी आपल्या राजीनाम्यात पर्यावरण संरक्षण, वनसंपत्तीचे संवर्धन आणि स्थानिक जनतेच्या हिताचा मुद्दा प्रामुख्याने मांडला आहे. उत्तर रायगड किसान मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडली. मात्र, पाली-सायडोंगर परिसरातील प्रस्तावित प्रकल्पामुळे संभाव्य जंगलतोड, पर्यावरणाचा ऱ्हास, वनसंपत्तीचे नुकसान आणि स्थानिक जनतेच्या भवितव्याबाबत निर्माण झालेले प्रश्न अस्वस्थ करणारे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

विकासाच्या नावाखाली सह्याद्रीचे नुकसान नको!

विकासाच्या नावाखाली सह्याद्रीचे जंगल, नैसर्गिक संपत्ती आणि स्थानिक जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी ठाम भूमिका जनार्दन म्हसकर यांनी मांडली आहे. पक्षातील पदापेक्षा पर्यावरणाचे संरक्षण, शेतकऱ्यांचे हित आणि स्थानिक जनतेचा आवाज आपल्यासाठी अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय कोणत्याही वैयक्तिक स्वार्थातून अथवा राजकीय आकसातून घेतलेला नसून पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून घेतल्याचेही म्हसकर यांनी नमूद केले आहे. आपला राजीनामा तातडीने स्वीकारण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी पक्षाकडे केली आहे.

सायडोंगरच्या जंगलतोडीचा मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी

दरम्यान, टोरंट पंप स्टोरेज प्रकल्प आणि सायडोंगर परिसरातील संभाव्य वृक्षतोडीचा मुद्दा आता केवळ पर्यावरणापुरता मर्यादित राहिलेला नाही. या प्रकल्पावरून भाजपमधील पदाधिकारीही उघडपणे नाराजी व्यक्त करत असल्याने पक्षांतर्गत मतभेद समोर येत आहेत. यापूर्वी दोन पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर आता जनार्दन म्हसकर यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील टोरंट प्रकल्पाचा मुद्दा भाजपसाठी राजकीय डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. आगामी काळात या प्रकल्पाविरोधातील आंदोलन तीव्र होणार का आणि भाजपमधील आणखी कोणते पदाधिकारी राजीनामा देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT