Sindhudurg pattern News : कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्रनाथ ऊर्फ बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्याने लढतीचे चित्रच पालटले. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे पुत्र अनिकेत हे बिनविरोध निवडून आले. यामुळे घोडेबाजाराकडे डोळे लावून असलेल्या मतदारांची निराशा झाली असून कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीतही बिनविरोधाचा सिंधुदुर्ग पॅटर्न दिसल्याची चर्चा आहे.
कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीत जोरदार घडामोडी झाल्या होत्या. मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या उमेदावारीची चर्चा होत होती. मात्र ऐन वेळी अलिबागचे शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली यांनी अपक्ष अर्ज भरला. यामुळे राष्ट्रवादीविरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून आहे. तर महायुतीतच बेबनाव असल्याचा संदेश राज्यभर गेला.
अशातच शेतकरी कामगार पक्षाच्या अॅड. मानसी म्हात्रे आणि अरविंद म्हात्रे यांच्यासह अपक्ष अनिल चोपडा यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांना घोषित झाली. यामुळे एका जागेसाठी ६ उमेदवार आणि १२ अर्ज दाखल झाल्याचे चित्र होते.
दरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी साम-दाम-दंड-भेद चा अवलंब करत आधी शिवसेनेचा विरोध शांत केला. तसेच भाजपच्या नेत्यांकडे जोडण्या लावण्याची जबाबदारी सोपावली. यावेळी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीतही बिनविरोधाचा सिंधुदुर्ग पॅटर्न राबवत भक्कम अशा मविआचा उमेदवारच फोडला. माने यांनी अर्ज मागे घेणे हे ठाकरे शिवसेनेच्यादृष्टीने धक्कादायक ठरले. त्याआधी जुईली यांनी अपक्ष अर्ज मागे घेतला होता. शिवाय शेतकरी कामगार पक्षाच्या अॅड. मानसी म्हात्रे आणि अरविंद म्हात्रे यांच्यासह अपक्ष अनिल चोपडा यांनीही माघार घेतल्याने ही प्रक्रिया बिनविरोध झाली.
दरम्यान आता या प्रक्रियात नीतेश राणे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत समोरच्या उमेदवाराने माघार घेतल्याने महायुतीच्या बऱ्याच जागा बिनविरोध झाल्या होत्या. या स्थितीत समोरचे बरेचसे उमेदवार मॅनेज झाल्याची चर्चा होती. काहीचा असाच प्रकार या लढतीत पहायला मिळाला. यावरून आता आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. यात घोडेबाजाराच्या शक्यतेने या निवडणुकीकडे डोळे लावून असलेल्या मतदारांची मात्र निराशा झाली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत बर्यापैकी घोडेबाजार चालतो. गेल्यावेळी एका मताचा दर ५ लाखाच्या वर गेल्याची चर्चा होती. यंदा स्थिती बऱ्यापैकी महायुतीच्या बाजूने होती. महायुतीच्या जागा वाटपात तटकरे यांनी ही जागा आपल्याकडे खेचून आणली. बलाबलाचा विचार करता सर्वाधिक मतदार शिंदे शिवसेनेकडे तर त्या पाठोपाठ भाजपकडे होते.
तिन्ही जिल्ह्यात मिळून शिंदे शिवसेनेकडे ३०० च्या वर भाजपकडे जवळपास २७५, राष्ट्रवादीकडे साधारण १२५, तर ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसकडे मिळून १०० च्या वर मतदार असल्याचे चित्र होते. त्यामुळे महाविकाससाठी ही लढत तशी सोपी होती. मात्र, मताधिक्य वाढविण्यासाठी त्यांना काम करावे लागले असते. अशा स्थितीत, घोडेबाजाराची शक्यता होती. त्यातही बंडखोरी कायम राहिली असती तर हा घोडेबाजार वाढण्याची चिन्हे होती.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. त्या आधी नगरपंचायती, महानगरपालिका, पालिका यांच्या लढती झाल्या होत्या. यात मतांसाठी पैसे वाटपाच्या चर्चा जोरात होत्या. निवडून आलेले बरेच सदस्य आता या कथित गुंतवणुकीच्या परताव्याच्या मागे लागले आहेत. हे सदस्य या निवडणुकीत मतदाराच्या भूमिकेत होते, पण आता लढत बिनविरोध झाल्याने त्यांची निराशा झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.