

Mahayuti News : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अमर राजूरकर यांना बिनविरोध निवडून आणण्याचे अशोक चव्हाण यांचे प्रयत्न फसले. महायुती एकत्र आहे, असा दावा अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला होता. पण या पत्रकार परिषदेतून शिवसेना गायब असल्याने त्याची जिल्ह्यात चर्चा झाली. ते इथे नसले तरी आमच्यासोबत असल्याचा दावा चव्हाण-चिखलीकर यांनी केला होता.
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस (Congress) उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने अशोक चव्हाण काहीसे अलर्ट झाले आहेत. शिवसेनासोबत असल्याचे चित्र मतदारांमध्ये गेले पाहिजे यासाठी अमर राजूकर, अशोक चव्हाण यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर यांनी चव्हाण-राजूरकर यांची सदिच्छा भेट घेत, आम्ही महायुतीसोबतच असल्याची ग्वाही दिली.
जिल्ह्यातील शिवसेनेचे (Shivsena) तिसरे आमदार हेमंत पाटील हे मात्र अद्यापही महायुतीच्या नेत्यांसोबत दिसत नसल्याने वेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही मित्रपक्षांना दूर ठेवत एकहाती सत्ता मिळवली होती. त्याआधीच्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीतही अशोक चव्हाण यांनी सोयीचे राजकारण केल्याचा त्यांच्यावर शिवसेनेचा आरोप होता.
आमदार हेमंत पाटील आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. हेमंत पाटील यांनी चव्हाण यांच्यावर निवडणुकी दरम्यान गंभीर आरोपही केले होते. नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीत ही जागा भाजपच्या वाट्याला गेली. अपेक्षेप्रमाणे अशोक चव्हाण यांनी आपल्या लाडक्या अमर राजूकर यांच्यासाठी उमेदवारी खेचून आणली. आता त्यांना तिसऱ्यांदा आमदार करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.
महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीकडे राजूकर निवडून येतील त्यापेक्षा किती तरी अधिकचे संख्याबळ आहे. तरीही कुठल्याही प्रकारची जोखीम स्वीकारायची नाही, हे ठरवून अशोक चव्हाण यांनी आधी प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी जुळवून घेतले, तर आता महापालिकेत ज्या शिवसेनेला दूर ठेवले होते त्या पक्षाच्या आमदारांनाही जवळ केल्याचे दिसून आले आहे.
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 'महायुती' अतिशय भक्कम आणि एकसंध आहे. महायुतीतील शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला अशोक चव्हाण महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर, शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, शिवसेना दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील-बोंढारकर, हदगावचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तुलजेश यादव हे उपस्थित होते. नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत, असा दावा हा फोटो पोस्ट करत अमर राजूरकर यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.