Dynasty Politics; Narayan Rane, Uday Samant and Sunil Tatkare sarkarnama
कोकण

Dynasty Politics : कोकण घराणेशाहीचे नवे 'ब्रँड अ‍ॅम्बेसेडर' : राणे, सामंत अन् तटकरेंच्या घरात एकवटली सत्ताकेंद्र

Sunil Tatkare, Uday Samant And Narayan Rane Dynasty Politics : एकेकाळी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला जात होता. पण आता महायुतीचे पर्व पाहिल्यास प्रत्येक पक्षात घराणेशाहीच पहायला मिळत आहे. आता कोकणही याला अपवाद राहिलेला नाही.

Aslam Shanedivan

MLC Elections : महाराष्ट्राच्या राजकारणात दिसणारी घराणेशाही नेहमीच चर्चेचा विषय असते. यात कोकण विभाग घराणेशाहीचा ब्रँड अॅम्बेसेडर बनलेला दिसून येत आहे. कोकण विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुलगा अनिकेत तटकरे यांना पक्षाकडून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या कुटुंबात यापूर्वीच विधानसभेची आमदारकी, कॅबिनेट मंत्रिपद आणि खासदारकी असताना त्यांनी अनिकेत यांना उमेदवारी देण्यासाठी केलेला आटापिटा सर्व राज्यात चर्चेचा विषय ठरला.

रत्नागिरीत शिवसेना मंत्री उदय सामंत याच्याही घरात असेच चित्र आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासह दोन आमदारकी त्यांच्या घरात आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंच्या घरातच सर्व सत्ता असून ते खासदार, मोठा मुलगा आमदार आणि लहान मुलगा आमदार, पालकमंत्री आहे. यामुळे कोकणातच घराणेशाहीतील नवे रेकॉर्ड तयार होत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

एकेकाळी काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप करणारे महायुतीतील नेते आता स्वतःच घराणेशाहीचे नवे रेकॉर्ड तयार करताना दिसत आहेत. कोकणही याला अपवाद नसून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांवर नजर टाकली तर संपूर्ण कोकण जणू तीनच राजकीय घराण्यांच्या भोवती फिरताना दिसत आहे. यामुळेच आता या तिन्ही घराण्यांना कोकण आंदण दिलंय की काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

राजकीय नेते कोणताही मोठा निर्णय घेताना किंवा पक्षांतर करताना कार्यकर्त्यांसाठी, निधीसाठी किंवा विकासासाठी प्रवेश करत असल्याचे सांगतात. मात्र खासदारकी, आमदारकी, जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती असो की नगरपालिका किंवा नगर पंचायतीची निवडणूक असो उमेदवारी मात्र आपल्याच घराण्यातील देतात.

कोकण विधानपरिषदेची एक जागा आपल्या पदरात पडून घेण्यासाठी शिवसेनेनं दबाव वाढवला. रायगडात मंत्री भरत गोगावले यांनी मुलगा विकाससाठी आग्रह धरला. तर आमदार महेंद्र दळवी यांनी थेट बंड करत मुलीला अपक्ष म्हणून अर्ज भरायला लावला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तर स्वतः खासदार, मुलगी आमदार आणि मंत्री असतानाही आपल्या मुलाला आमदार करण्यासाठी जीवाचं रान केल्याचे दिसत आहे.

2009 पासून तटकरेंच्या घरात सत्ताकेंद्र :

2009 मध्ये सुनील तटकरे श्रीवर्धन मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. पुढच्या वर्षी म्हणजे 2010 आणि 2012 मध्ये त्यांनी भाऊ सुनील तटकरे यांना विधानपरिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार केले. 2014 मध्ये सुनील तटकरे विधानसभा आमदारकीची मुदत संपण्यापूर्वीच विधानपरिषदेवर आमदार झाले. तर श्रीवर्धन मतदारसंघातून पुतण्या अवधूत तटकरे यांना निवडून आले. म्हणजे 2014 ते 2018 या काळात तटकरे यांच्या घरात 3 आमदार होते.

2018 मध्ये अनिल तटकरे यांना बाजूला करत मुलगा अनिकेत तटकरे यांना कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार केले. 2019 मध्ये सुनील तटकरे रायगड मतदारसंघातून लोकसभेवर खासदार झाले. त्याचवर्षी त्यांनी बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धनमधून आदिती तटकरे यांना विधानसभेवर निवडून आणलं.

मविआ सरकारमध्ये आदिती तटकरेंना राज्यमंत्री केलं. तर राष्ट्रवादी फुटल्यानंतर महायुतीसोबत जात कॅबिनेट मंत्री केलं. 2024 मध्येही सुनील तटकरे लोकसभेवर पुन्हा निवडून गेले. त्याचवर्षी पुन्हा मुलीला निवडून आणले, पुन्हा कॅबिनेट मंत्री केले. आता विधानपरिषदेसाठी पुन्हा मुलाला निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहे. आता अनिकेत तटकरे निवडून आले तर एकाच घरात दोन आमदार, कॅबिनेट मंत्री, खासदार असणार आहेत.

घराणेशाहीच्या बाबतीत रत्नागिरी जिल्हाही मागे नाही. येथे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनीही घराणेशाहीचा कित्ता गिरवला आहे. त्यांचे भाऊ किरण सामंत आमदार आहेत. उदय सामंत गेली 2 दशक रत्नागिरीचे आमदार आहे. यामुळे जिल्ह्यातच एक भाऊ आमदार, पालकमंत्री आणि दुसरा भाऊही आमदार आहे.

घराणेशाहीत सिंधुदुर्ग जिल्हा वरच्या स्थानावर असून एकाच घरात कधीकाळी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिपद, खासदारकी आणि आता पालकमंत्री पदासह आमदारकीही आहे. येथे नारायण राणे यांच्या एकाच घरात सगळी पदे असून शिवसेना-काँग्रेस आणि आता भाजप असे प्रमुख पक्षांचा इतिहास दिसतो.

नारायण राणे शिवसेनेत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर स्वतः आमदार, एक मुलगा आमदार आणि एक मुलगा खासदार झाला. पुढे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते खासदार आणि त्यानंतर थेट केंद्रीय उद्योग मंत्री झाले. आताही ते भाजपचे खासदार असून त्यांचे जेष्ठ पुत्र निलेश राणे शिवसेनेत आमदार आहेत. तेही खासदार राहिले आहेत. त्याचे धाकटे पुत्र नितेश राणे आमदार असून कॅबिनेट मंत्री आहेत. सध्या ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT