Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या अवयवांची बेकायदा विक्री करण्याचा प्रयत्न वनविभागाने उधळून लावला. बनावट ग्राहक बनून सापळा रचलेल्या वनविभागाच्या पथकाने तिघांना अटक केली. १२ वाघनखांच्या विक्रीसाठी अडीच लाख रुपयांचा व्यवहार ठरल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई कुडाळ बस डेपो परिसरातील काळप नाका येथे करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये वेंगुर्ले बसस्थानकातील शिपाई रोहिदास हरिश्चंद्र कामत (वय ४७, रा. कामतवाडी, वायंगणी, ता. वेंगुर्ले), विजय रविकांत शिंदे (वय ३१, रा. मुळदे, ता. कुडाळ) आणि मुनाफ इस्माईल मुकादम (वय ४०, रा. अनपूर, विजयदुर्ग, ता. देवगड) यांचा समावेश आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या बेकायदा विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सहायक वनसंरक्षक, सावंतवाडी आणि कुडाळ वनपरिक्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाईचे नियोजन केले. संशयित रोहिदास कामत याच्याशी वनविभागाने बनावट ग्राहक बनून संपर्क साधला आणि व्यवहार निश्चित केला.
कामत याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वेंगुर्ले बसस्थानकावर बोलावले. तेथे वाघनखांच्या विक्रीसाठी ठरलेली रोख रक्कम उपलब्ध आहे का, याची खातरजमा केली. त्यानंतर १२ वाघनखांच्या विक्रीसाठी अडीच लाख रुपयांचा व्यवहार ठरवण्यात आला. ठरल्याप्रमाणे वाघनखे घेऊन एक व्यक्ती कुडाळ बस डेपोमध्ये येणार असल्याची माहिती कामत याने दिली.
यानंतर वनविभागाच्या पथकाने काळप नाका येथील बस डेपोच्या प्रवेशद्वाराजवळ सापळा रचला. व्यवहाराची बोलणी सुरू असतानाच पथकाने छापा टाकला आणि तिघांना ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणी वनपाल, नेरूर तर्फे हवेली यांनी गुन्हा दाखल केला आहे. तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यापैकी दोघांना दोन दिवसांची वनकोठडी, तर एकाला न्यायालयीन कोठडी सुनावली.
जप्त केलेला मुद्देमाल
या कारवाईत वाघाचा सुमारे पाच सेंटीमीटर लांबीचा एक दात, बिबट्याची सुमारे चार सेंटीमीटर लांबीची दोन नखे आणि सोन्यात मढवलेले दोन सुळे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वनविभागाचे आवाहन
वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील, मठ वनपाल संजय हजारे, सूर्यकांत सावंत, गौरेश राणे, वनरक्षक धामापूर, अतुल खोत, ब्रह्मकुमार भोजने, अनिकेत माने, समीर खरबत, प्रवीण कमळकर, राहुल मयेकर यांच्यासह वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. वन्यप्राण्यांच्या तस्करीसंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी उपवनसंरक्षक किरण जगताप यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.