Sindhudurg Name Changes Notification : तळकोकणात 217 ठिकाणांची जातीवाचक नावे बदलली; वस्त्यांसह रस्त्यांसाठी राजपत्र प्रसिद्ध

Sindhudurg Village Road Name Change Notification : राज्य शासनाने ग्रामीण भागातील वस्त्या व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे राज्यातील पहिली अंमलबजावणीचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेण्यात आला आहे.
Sindhudurg Collector Office
Sindhudurg Collector OfficeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १९२ वस्त्या आणि २५ रस्त्यांना आता अधिकृतपणे नवी ओळख मिळाली आहे. या २१७ ठिकाणांची जातीवाचक नावे बदलण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील प्रसिद्धीमुळे अधिकृत मान्यता मिळाली आहे. विशेष म्हणजे, या निर्णयाची अंमलबजावणी करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली.

सामाजिक समता आणि बंधुतेला प्रोत्साहन

सामाजिक समता, बंधुता आणि लोकशाही मूल्यांना बळकटी देण्यासाठी राज्य शासनाने ग्रामीण भागातील वस्त्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय घेतला होता. या नावांऐवजी महापुरुषांची नावे किंवा लोकशाही मूल्यांशी संबंधित नावे देण्याचे निश्चित करण्यात आले होते. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधित ग्रामसभांनी ठराव मंजूर केले. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांमार्फत नामांतराचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आले. पुढील कार्यवाहीसाठी हे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नामांतराला मंजुरी

ग्रामविकास विभागाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे जातीवाचक नावे बदलण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आदेश काढून जिल्ह्यातील १९२ वस्त्या आणि २५ रस्त्यांची नावे बदलण्यास मान्यता दिली होती. पालकमंत्री नीतेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रक्रियेला गती मिळाल्याचे सांगण्यात आले.

Sindhudurg Collector Office
Sindhudurg Crime : मोठी बातमी! शिवसेनेच्या नेत्याच्या घराबाहेर सापडलं ड्रग्स, पोलिसांनी घेतलं ताब्यात

शासनाच्या राजपत्रात नामांतराची अधिकृत नोंद

या निर्णयाचे महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक, कोकण विभागीय पुरवणीच्या ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीतील अंकात पृष्ठ क्रमांक सातवर प्रसिद्धीकरण करण्यात आले आहे. आदेश क्रमांक ८६९/२०२६ अन्वये ही नोंद करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयामार्फत नामांतराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

राजपत्रात प्रसिद्धी झाल्याने नव्या नावांच्या अधिकृत वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. यापुढे ग्रामपंचायती, शासकीय कार्यालये आणि नागरिकांनी दप्तरी नोंदी, नामफलक तसेच दैनंदिन व्यवहारांमध्ये जुन्या जातीवाचक नावांऐवजी नवीन नावांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Sindhudurg Collector Office
Sindhudurg Women Officers : तळकोकणात ‘लेडी सिंघम’ पॅटर्न! जिल्हाधिकारींसह पाच महत्त्वाच्या पदांची धुरा महिलांकडे

नव्या नावांची यादी कुठे मिळणार?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्या आणि २५ रस्त्यांना देण्यात आलेल्या नवीन नावांची सविस्तर यादी जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभाग, सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग तसेच सर्व गटविकास अधिकारी कार्यालयांत उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरही या निर्णयाच्या राजपत्राची प्रत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com