Madhur Mhatre Sarkarnama
कोकण

Madhur Mhatre Disqualification Petition : शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याचा दावा, पण अपात्र नाही; मधुर म्हात्रेंना मोठा दिलासा

Petition dismissed; Madhur Mhatre retains his councillor post in Kalyan-Dombivli : शिवसेना ठाकरे पक्षाच्या तक्रारीवर कोकण विभागीय आयुक्तांचा निर्णय; पक्षत्याग सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे स्पष्ट

Pradeep Pendhare

Kalyan Dombivli politics : कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात पक्षांतराच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. शिवसेना ठाकरे पक्षाकडून निवडून आलेले नगरसेवक मधुर उमेश म्हात्रे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली अपात्रता याचिका कोकण विभागीय आयुक्त रुबेल अग्रवाल यांनी फेटाळली आहे.

या निर्णयामुळे म्हात्रे यांचे नगरसेवकपद तूर्तास कायम राहणार असून शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) नगरसेवक आणि गटनेते उमेश धोंडू बोरगांवकर यांनी म्हात्रे यांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल केली होती. प्रभाग क्रमांक 13 मधून निवडून आलेल्या म्हात्रे यांनी 16 मार्च रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.

या दाव्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावरील फोटो आणि पोस्ट, परिसरात लावण्यात आलेले फ्लेक्स तसेच 20 मार्च रोजी झालेल्या महासभेत म्हात्रे हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेच्या नगरसेवकांच्या आसनावर बसल्याचा मुद्दा मांडण्यात आला होता.

मात्र, म्हात्रे यांनी हे आरोप फेटाळून लावले. 15 मार्चलाच ठाकरे शिवसेना पक्षाने आपले निलंबन आणि हकालपट्टी जाहीर केली होती, असा दावा त्यांनी सुनावणीदरम्यान केला. एखाद्या नेत्याची भेट घेतल्याने किंवा त्याच्यासोबत छायाचित्र काढल्याने संबंधित पक्षात अधिकृत प्रवेश केल्याचे सिद्ध होत नाही, असा युक्तिवादही त्यांच्या बाजूने करण्यात आला.

सुनावणीदरम्यान कथित पक्षांतर सिद्ध करण्यासाठी याचिकाकर्त्यांकडून पुरेसे आणि ठोस पुरावे सादर करण्यात आले नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. अंतिम सुनावणीच्या दिवशीही याचिकाकर्ते गैरहजर राहिल्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे म्हात्रे यांनी स्वेच्छेने पक्षत्याग केला असल्याचे सिद्ध होत नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्यासाठी आवश्यक आधार उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे म्हात्रे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी फेटाळण्यात आली.

या निर्णयामुळे म्हात्रे यांना महासभेच्या कामकाजात सहभागी होता येणार असून त्यांचे नगरसेवकपद कायम राहणार आहे. मात्र, मार्च महिन्यात म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा ठाकरे शिवसेनेचा दावा कायम आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या निर्णयामुळे कल्याण-डोंबिवलीतील पक्षांतराच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे. ठाकरे शिवसेनेच्या तक्रारीला अपेक्षित निकाल न लागल्याने स्थानिक राजकारणात या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT