कणकवली नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
या भेटीनंतर संदेश पारकर शिंदे शिवसेनेत जाणार का, यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शहराच्या विकासासाठी “निर्णय घ्यावाच लागेल” असे सूचक वक्तव्य पारकर यांनी केले आहे.
Sindhudurg News : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीची निवडणुकीत भाजपला धोबीपच्छाड देत शहर विकास आघाडीने विजय मिळवला. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकरही तब्बल १७ वर्षांनंतर पुन्हा कणकवलीचे नगराध्यक्ष बनले. तर या यशात मोठा वाटा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंचा होता. या विजयानंतर संदेश पारकर मुंबईला गेले होते. पण ते मातोश्रीवर न जाता एकनाथ शिंदेंना भेटले. यामुळे ते शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर कोकणात निवडून आलेला ठाकरेंचा दुसराही नगराध्यक्ष फुटला? अशा चर्चा जोर धरू लागल्या होत्या. यावर संदेश पारकर यांनी आता स्पष्टीकरण दिले असून “शेवटी निर्णय तर घ्यावाच लागणार...” असेही म्हटलं आहे. यामुळे ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून चांदा ते बांदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश मिळाले आहे. तर कोकणातही त्यांना मोठे यश मिळाले असून तळकोकणात कणकवली आणि मालवणवर शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा फडकला आहे. पण निवडणुकीदरम्यान येथे झालेल्या आरोप-प्रत्यारोपासह स्टींग ऑपरेशनमुळे या निवडणुकीच्या निकालाकडे अख्ख्या राज्याचे लक्ष लागले होते.
तर निकालानंतर येथे पालकमंत्री नितेश राणे यांना त्यांच्याच होमपिचवर पराभवाचा धक्का ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला. तेही त्यांचेच भाऊ आमदार निलेश राणेंच्या मदतीने. यामुळे याची जोरदार चर्चा झाली. मात्र निकाला दुसऱ्याच दिवशी मुंबई गाठत त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शिवसेनेत मोठी खळबळ उडाली. तर ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाल्या.
यानंतर आता त्यांनी, ही भेट फक्त एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचे आभार मानण्यासाठी होती, असे स्पष्टीकरण देताना शिवसेनेच्या प्रवेशाला पुर्ण विराम दिला आहे. तसेच कणकवली शहराचा विकास करायचा असेल, तर मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार असल्याचेही पारकर म्हणालेत. पण आता त्यांच्या अशा सुचक वक्तव्यामुळे नेमका अर्थ काय काढावा असा प्रश्न आता कणकवलीकरांना पडला आहे.
या वक्तव्यानंतर आमदार निलेश राणे यांचेही मोठं वक्तव्य समोर आले असून त्यांनी, 'संदेश पारकर यांना पाठिंबा देताना आमच्यात काही चर्चा झाल्या आहेत. मात्र, सध्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पारकर यांना भेटून सविस्तर बोलू', असे म्हटले आहे.
यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर पारकर यांनी एकनाथ शिंदे याची घेतलेली भेट ही अशीच नव्हती असाच अर्थ शहरात काढला जात आहे. मात्र रत्नागिरीत त्यांचा आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या सत्कारामुळे ते नेमकी कोणती भूमिका घेणार असाही सवाल अनेकांच्या मनात उभा होताना दिसत आहे.
1. संदेश पारकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट का घेतली?
→ त्यांनी सांगितले की ही भेट आभार मानण्यासाठी होती.
2. संदेश पारकर शिंदे शिवसेनेत जाणार का?
→ सध्या त्यांनी कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर केलेला नाही.
3. या भेटीमुळे कणकवलीच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
→ स्थानिक राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
4. संदेश पारकर सध्या कोणत्या पक्षात आहेत?
→ ते सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत.
5. ‘तो निर्णय’ म्हणजे नेमकं काय?
→ विकासासाठी पक्षीय भूमिका बदलण्याचा संकेत असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.