Aditi Tatkare CM Ladki Bahin Yojana  sarkarnama
कोकण

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी मोठी बातमी! e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार संधी, पण असणार डेडलाईन

Ladki Bahin Yojana e-KYC Correction : राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील लाखो लाभार्थी महिलांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

Aslam Shanedivan

  1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना ई-केवायसी दुरुस्तीसाठी एकदाच संधी देण्यात येणार आहे.

  2. ई-केवायसीमध्ये चुकीची माहिती भरली असल्यास ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत दुरुस्त करता येणार आहे.

  3. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती अधिकृतपणे जाहीर केली आहे.

Raigad News : राज्यातील सत्ता महायुतीच्या हाती देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणारा 1500 रुपयांचा लाभ सुरू राहण्यास मदत मिळणार आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळाला भेट देऊन केवायसी करणाऱ्या महिलांना ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची संधी दिली उपलब्ध करून दिली आहे. या नव्या निर्णयाबाबत महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.

राज्य सरकारच्या या सर्वाधिक लोकप्रिय अशा योजनेत सध्या मोठे बदल केले जात असून ई-केवायसी करण्याचे निर्देश लाडक्या बहि‍णींना देण्यात आले आहेत. या योजनेतील घुसखोरी, सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेले लाभासह अनेक गोष्टी उघड झाल्यानेच सरकारने हा निर्णय घेतला. त्या पद्धतीने गेल्या काही महिन्यापासून लाखो लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली आहे. मात्र ही प्रक्रिया पार पाडत असताना अनेक महिलांच्या काही चुका झाल्या आहेत.

काही लाडक्या बहिणींनी चुकीचे ऑप्शन निवडले असून यामुळे त्यांचा मोबदलाही थकल्याचे समोर आले आहे. यामुळे आता सरकारने अशा लाडक्या बहि‍णींना ई-केवायसीत दुरुस्ती करण्याची एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही संधी एकदाच मिळणार असून यानंतर ई-केवायसीत कोणताही बदल करता येणार नाही. यामुळे सध्यातरी लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.

काय म्हणाल्या आदिती तटकरे?

ई- केवायसी दुरुस्तीची केवळ एक संधी सरकारने दिल्या संदर्भात माहिती देताना मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत.

सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात येत आहे.

या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे.

FAQs :

1. लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी दुरुस्तीची संधी किती वेळा मिळणार आहे?
फक्त एकदाच ई-केवायसी दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे.

2. ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम तारीख कोणती आहे?
31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत आहे.

3. कोणत्या महिलांना ई-केवायसी दुरुस्ती करता येईल?
ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करताना चुकीची माहिती भरली आहे त्यांना.

4. ई-केवायसी दुरुस्ती न केल्यास काय होईल?
चुकीची माहिती कायम राहिल्यास योजनेचा लाभ थांबू शकतो.

5. ही योजना कोणता विभाग राबवतो?
महाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास विभाग ही योजना राबवतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT