Maharashtra Shaktipeeth Highway plan; CM Devendra Fadnavis dream project Sarkarnama
कोकण

Shaktipeeth Highway : फडणवीसांच्या ड्रिम प्रोजेक्टचा केंद्र सरकारच्या निर्णयाला धक्का? 'शक्तीपीठा'मुळे ‘इको-सेंसिटिव्ह झोन’ मधील गावांचा प्रश्न ऐरणीवर

Shaktipeeth highway project impact kokan : राज्यातील महत्त्वाकांक्षी आणि सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चाच्या 'शक्तिपीठ महामार्ग' प्रकल्पात सरकारने मोठे बदल करत सुधारित आराखड्याला मंजुरी दिली आहे.

Aslam Shanedivan

  1. शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याला सरकारने मंजुरी दिली असून मूळ मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत.

  2. शेतकऱ्यांचा विरोध आणि पर्यावरणीय मुद्द्यांमुळे मार्ग बदलून सावंतवाडी व दोडामार्गला महत्त्व मिळाले आहे.

  3. या प्रकल्पामुळे विकासाच्या संधी वाढणार असल्या तरी पर्यावरणीय परिणामांवरून वाद पुन्हा निर्माण झाला आहे.

sawantwadi Shaktipeeth highway News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा एकदा आराखड्यात बदल करण्यात आला असून यात मोठे बदल करण्यात आले आहेत. सुधारित आराखड्यात मूळ मार्गात बदल करण्यात आल्याने सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. तर पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातून हा महामार्ग जाणार असल्याने प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवाद्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. केंद्र शासनाने ‘इको-सेंसिटिव्ह झोन’ म्हणून जाहीर केला असतानाही या नव्या मार्गामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होतील असा इशारा देण्यात आला आहे.

शक्तिपीठ महामार्गाच्या पूर्वीचा आराखड्यात बदल करणारा सुधारित आराखडा मंजूर करण्यात आला आहे. नव्या आराखड्यानुसार पवनार ते गोवा सीमेवरील पत्रादेवीपर्यंत जाणाऱ्या मार्गाला स्थानिक विरोध आणि जैवविविधतेचे प्रश्न लक्षात घेऊन बदल करण्यात आला आहे. आता हा मार्ग दिग्रज (जि. वर्धा) ते बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) असा निश्चित करण्यात आला आहे. तर सुधारित आराखड्यानुसार महामार्गाची एकूण लांबी ८०२ किलोमीटरवरून ८५६.७६५ किलोमीटर झाली आहे.

तर नागपूर ते गोवा हा प्रवास १८ तासांवरून केवळ ८ तासांपर्यंत आणणे हे सरकारचे उद्दिष्टे आहे. तर माहूर, औंढा नागनाथ, परळी वैद्यनाथ, अंबाजोगाई, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूरची महालक्ष्मी, पन्हाळा-ज्योतिबा आणि रेडीचा गणपती अशा मंदिरांसह २१ प्रमुख धार्मिक स्थळांना जोडण्याचा सरकारचा मानस आहे. यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळण्यासह सावंतवाडी–दोडामार्ग पट्ट्यात वाहतूक, व्यापार आणि पर्यटनाच्या संधी वाढणारा ठरेल असे बोलले जात आहे.

मात्र आता नव्या नव्या आराखड्यातील बदलामुळे महामार्गामध्ये सावंतवाडी तालुक्यातील १२ आणि दोडामार्ग तालुक्यातील १ गावातून जाणार आहे. यापुर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३८ किलोमीटर लांबीचा आणि १०० मीटर रुंदीचा हा महामार्ग जिल्ह्यातील तेरा गावांतून जाणार होता, ज्यासाठी अंदाजे ३८० हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार होते. पण आता सावंतवाडी तालुक्यातील गेळे ते तांबोळीपर्यंतची ८ गावे आता वगळण्यात आली आहेत.

तर सावंतवाडी तालुक्यातील केगद, डेगवे, बांदा, पडवे आणि माजगाव तर दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे, भेकुर्ली, कोलझर, तळकट आणि झोळंबे या गावांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच आजरा–चंदगड – दोडामार्ग मार्गे सावंतवाडीतील बांदा – पत्रादेवी (गोवा) ला जोडला जाणार आहे.

दरम्यान एकीकडे या मार्गामुळे दुर्गमभागातील गावे नकाशावर येणार असून अनेक प्रश्न मार्गी लागणर आहेत. पण या नव्या मार्गामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. यामुळेच पूर्वी होणाऱ्या ३० किमीचा बोगद्याला विरोध झाला होता. तर आंबोलीच्या जैवविविधतेच्या प्रश्नावरून नागरीक रस्त्यावर उतरले होते. आता आता नव्याने समाविष्ट झालेल्या आराखड्यात गावांत कोलझर, तळकट, झोळंबे, पडवे आणि माजगाव या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

ही गावे केंद्र शासनाने ‘इको-सेंसिटिव्ह झोन’ म्हणून जाहीर केली आहेत. पण या आदेशाची राज्य सरकारला विसर पडल्याचे दिसत असून या संवेदनशील भागातून महामार्ग जाणार आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे. शक्तिपीठ महामार्गाचे पुनर्रेखांकन पश्चिम घाटासाठी धोक्याची घंटा असल्याचा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी दिला आहे.

त्यांनी, नवीन मार्ग हा पश्चिम घाटातील अतिसंवेदनशील आणि जैवविविधतेने नटलेल्या भागातून जाणार असून यामुळे किंग कोब्रा, पट्टेरी वाघ, हत्ती आणि बिबट्यांच्या नैसर्गिक अधिकावासावर परिणाम करणारा आहे. हा नवीन मार्ग या निसर्गसंपन्न क्षेत्राला धोकादायक ठरणारा असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केगद, कुंभवडेतून तळकट, झोळंबे मार्गे डेगवे-बांद्यातून जाईल. यामुळे असंख्य महाकाय वृक्षांची बेसुमार तोड होईल, यामुळे निसर्गाचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल. पर्यावरणाचा समतोल ढासळले, असाही इशारा परुळेकर यांनी दिला आहे.

FAQs :

1. शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प काय आहे?
हा महाराष्ट्रातील एक मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प असून राज्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडण्याचा उद्देश आहे.

2. प्रकल्पात बदल का करण्यात आले?
शेतकऱ्यांचा विरोध आणि पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन मार्ग बदलण्यात आला.

3. कोणत्या भागांना फायदा होणार आहे?
सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांना विशेष फायदा होण्याची शक्यता आहे.

4. पर्यावरणावर काय परिणाम होऊ शकतो?
संवेदनशील क्षेत्रातून महामार्ग गेल्यामुळे पर्यावरणीय नुकसान होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

5. या प्रकल्पाची अंदाजित किंमत किती आहे?
या प्रकल्पाची किंमत सुमारे एक लाख कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT