सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व आठ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
भाजप व शिंदे शिवसेना वरिष्ठ पातळीवर महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
खासदार नारायण राणे यांच्याकडे महायुतीची सूत्रे देण्यात आली असून जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच जाहीर होणार आहे.
Sindhudurg News : सिंधुदुर्गात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा झाली असून महायुतीची सुत्रे पुन्हा एकदा खासदार नारायण राणे यांच्याकडे गेली आहे. यावर आज (ता.१७) शिक्कामोर्तब झाला असून महायुतीच्या माध्यमातूनच आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविणार. भाजप आणि शिवसेना जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच जाहीर होईल, तसेच लगेच प्रचाराचाही प्रारंभ होईल, अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी दिलीय. महायुतीच्या अनुषंगाने भाजप आणि शिवसेना पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची राणेंच्या ओम गणेश निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर येथील प्रहार भवनमध्ये खासदार राणे यांनी त्याबाबतची माहिती दिली.
यावेळी पालकमंत्री नीतेश राणे, आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ॲड. अजित गोगटे, शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, संजय आंग्रे, दीपलक्ष्मी पडते, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आधी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषद आणि आठही पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून जिल्हा परिषदेच्या ५० तर आठही पंचायत समित्यांच्या मिळून १०० जागांसाठी मतदान होणार होणार आहे. याच पार्श्वभूमिवर जिल्ह्यात विरोधकांना विकासाचे एकही काम करता आलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही विरोधकांचा पार धुव्वा उडवू, असा विश्वास खासदार राणे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीतील सर्व घटक पक्ष स्वतंत्र लढले होते. शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात युती न झाल्याने दोन्ही पक्ष आमने-सामने आले होते. तसेच या निवडणुकीत एकमेकांवर झालेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे ही लढत राज्यात लक्षवेधी ठरली होती. या निवडणुकीआधी खासदार राणे यांनी महायुतीचा आग्रह धरला होता. मात्र त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले नव्हते. त्यांनी प्रचारापासून लांब राहणे पसंद केले होते. तर प्रचारात एकमेकांच्या विरोधात झालेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे महायुतीतील घटकपक्षांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.
यानंतर आता जिल्हा परिषदेच्या लढती होत असून शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्याकडे जवळपास सगळ्याच मतदारसंघात प्रबळ इच्छूकांची संख्या पाहता तिकीट वाटप करणे सोपे राहणार नाही. या सगळ्याचा विचार करता महायुतीबाबतचा संभ्रम व्यक्त केला जात होता. पण दोन्ही पक्षाच्या वरिष्ठस्तरावरून महायुती म्हणूनच या निवडणुका लढण्याचा आदेश आले असून महायुतीची सगळी सुत्रे खासदार राणे यांच्याकडे दिली गेली आहेत.
यावेळी खासदार राणे म्हणाले, ‘सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसह सर्व आठही पंचायत समित्यांच्या निवडणुका आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढणार आहोत. या अनुषंगाने आज दिवसभर महायुती नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या. जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समित्यांच्या १०० जागा वाटपाचा फॉर्म्युला उद्या जाहीर होणार आहे.
सिंधुदुर्गच्या विकासात भाजप आणि शिवसेनेचे मोठे योगदान आहे. विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. विरोधकांना या निवडणुकीत मत मागण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे सर्व जागांवर आमचा विजय निश्चित आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर त्यांच्यासाठी जागा वाटपाबाबत निर्णय घेऊ.’ असेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेची निवडणूक ही खासदार राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली लढविली जाणार असून जागा वाटपाबाबत वरिष्ठ नेतेमंडळी ठरवतील भाजप जिल्हाध्यक्ष सावंत यांनी म्हणताच खासदार राणे भडकले. तसेच त्यांनी ‘जिल्ह्यातील वरिष्ठ मंडळी जागा वाटपाबाबत ठरवतील’ असेही ठणकावले.
तर राणे बघतील...
महायुतीबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत देखील राणेंच्या निवासस्थानी उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मागच्या निवडणुकीची चर्चा आता नको. राणेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजपने युतीच्या माध्यमातून निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या तिन्ही विधानसभा मतदारसंघात आमचे स्थानिक नेते जागा वाटपाबाबत समन्वय साधतील. जर बंडखोरी झाली तर राणेंच्या नेतृत्वाखाली कसं लढाचंय हे आम्हाला माहिती आहे, असेही सामंत म्हणाले.
1. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक कधी होणार आहे?
५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
2. या निवडणुकीत महायुती आहे का?
होय, भाजप व शिंदे शिवसेना महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
3. एकूण किती जागांसाठी निवडणूक आहे?
जिल्हा परिषदेसाठी ५० आणि पंचायत समित्यांसाठी १०० जागा आहेत.
4. महायुतीची सूत्रे कोणाकडे आहेत?
खासदार नारायण राणे यांच्याकडे महायुतीची सर्व सूत्रे देण्यात आली आहेत.
5. जागावाटपाचा निर्णय कधी जाहीर होणार?
पुढील दोन दिवसांत भाजप–शिवसेना जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.