Ratnagiri News : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषदेची जागा कोणाला मिळणार याच्याआधीच महायुतीत वाद पाहायला मिळत आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळत असतानाच शिवसेनेतच दुसरा इच्छुक तयार झाला आहे. यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी मात्र महाविकास आघाडीकडून शांत खेळी खेळली जात असून ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात आली आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेसाठी उमेदवारीही निश्चित झाली आहे. महाविकास आघाडीकडून माजी आमदार बाळ माने यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे येथे महायुतीविरोधात महाविकास आघाडी अशी तगडी लढत होण्याची शक्यता आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतील रंगत वाढली असून मविआनेही निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार बाळ माने यांच्या नावाची घोषणा झाली आहे. एकीकडे महायुतीचे पारडे या निवडणुकीत जड असल्याचे चित्र असतानाच सक्षम पर्याय म्हणून बाळ माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. यानंतर, यापूर्वीच्या आमदारांनी काहीच काम केलेले नाही. त्यामुळे मतदार आपल्याला संधी देतील, असा विश्वास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी व्यक्त केला आहे.
महायुतीच्या वरिष्ठ पातळीवरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक मतदारांशी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. या अंतर्गत सर्वेक्षणात आणि चर्चेत बहुतांश मतदारांनी राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांच्याच नावाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे महायुतीकडून अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीची केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याचे आता स्पष्ट झाले असून, यामुळे कोकणातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
महायुतीने अंतर्गत तडजोडीचा एक मोठा फॉर्म्युला आखल्याचे समजते. रायगडचे बहुप्रतिक्षित पालकमंत्रीपद शिवसेना शिंदेगटाचे मंत्री भरत गोगावले यांना देण्याचे निश्चित झाले असून, त्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना ही उमेदवारी दिली जात आहे.
महाविकास आघाडीचा उमेदवार कालपर्यंत निश्चित नव्हता; परंतु आज मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाटे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक आता एकतर्फी होणार असेच चित्र तयार झाले असून ठाकरेंची शिवसेना आणि मविआतील घटक पक्ष तयारीवला लागल्याचे दिसत आहे.
बाळ माने (बाळासाहेब माने) हे रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील माजी आमदार असून ते मूळचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. १९९९ मध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या काळात पहिल्यांदा निवडून लढवली होती. त्याचवेळी ते आमदार झाले. परंतु २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उदय सामंत यांच्याशी असलेल्या राजकीय वैमनस्यामुळे भाजपला रामराम ठोकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
दरम्यान त्यांनी उदय सामंत यांच्याविरोधात २०२४ साली पुन्हा निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. याच्याआधी देखील २००४, २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा उदय सामंत यांच्याविरुद्ध पराभव झाला आहे. तर २०१९ मध्ये युती असल्यामुळे त्यांनी माघार घेतली होती. तर नुकताच त्यांनी झालेल्या निवडणुकीत मतदारसंघामध्ये बोगस मतदारांचा मुद्दा उचलून धरत राजकीय चर्चा घडवून आणली होती.
सुवर्णमध्य साधला
कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीच्या मतदारांत शिवसेनेकडे ३३४ मतदार, भाजपकडे २६४ मतदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे १६५ मतदार आहेत. शिवसेनेकडे सर्वाधिक ३३४ मते असल्याने सुरुवातीला त्यांच्याकडून आग्रही मागणी झाली होती; मात्र, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीने ‘पालकमंत्रिपद शिवसेनेला आणि विधान परिषद राष्ट्रवादीला’ असा सुवर्णमध्य काढला आहे.
विरोधी पक्ष म्हणून लोकशाहीमध्ये निवडणूक लढवणे आवश्यक आहे. यावर आमचे एकमत होऊन ही जागा लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. आतापर्यंत निवडून आलेल्या आमदाराने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काहीच काम केलेले नाही. त्यांचे प्रश्न हे कधी जाणून घेतले नाहीत किंवा सोडवले नाहीत. या निवडणुकीत चिन्ह नसते. चांगला सक्षम पर्याय म्हणून आम्हाला मतदान होईल.- बाळ माने, महाविकास आघाडीचे उमेदवार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.