Raigad Political News : राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. तोच राज्यात पहिली बंडाची ठिणगी कोकणात पडली असून येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी तटकरे यांना विरोध असल्याचे स्पष्ट करत जुईली दळवी यांनी आरोप केले आहेत. यामुळे महायुतीत नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. दरम्यान आमदार महेंद्र दळवी यांनी देखील पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केल्याने शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या मुलासाठी (अनिकेत तटकरे) या जागेवर दावा केला आहे. तोच मंत्री भरत गोगावले देखील आपल्या मुलासाठी आग्रही असल्याचे दिसत आहेत.
यामुळे महायुतीत पेच निर्माण झाल्याची स्थिती असतानाच आता या जागेवरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. या जागेवर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तटकरे यांना विरोध असल्याचे स्पष्ट करत त्यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. यानंतर आता महायुतीत नवा राजकीय तिढा निर्माण झाला असून प्रत्येक पक्षासाठी ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे.
यावेळी आम्ही तटकरेंच्या विरोधात असून त्यांनी कायम अन्याय केला आहे. जर अनिकेत तटकरेंना उमेदवारी मिळाली तर त्यांचा आम्ही प्रचार करणार नाही. आम्ही तटस्थ भूमिका घेऊ असा इशारा यावेळी जुईली दळवी यांनी दिला असून तटकरेंनी दिलेला शब्द कधीच पाळत नसल्याचा थेट आरोप केला आहे. तसेच कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, असा ठाम निर्धारही जुईली दळवी यांनी बोलून दाखवला आहे.
दरम्यान शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले असून आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या जागेसाठी पक्षातील नेते बार्गेनिंग करीत असल्याचे महेंद्र दळवी यांना आरोप केला आहे. यामुळे दळवी यांचा नेमका रोख कुणाकडे आहे याची चर्चा इथल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
तसेच दळवी यांनी पालकमंत्री पदावर शिवसेनेचाच अधिकार असताना बार्गेनिंग कशाला असा थेट सवाल ही त्यांनी पक्षातील नेत्यांना विचारला आहे. कोकणच्या जागेवर आमचाच अधिकार असून इथं राष्ट्रवादी काँग्रेसला आमचा विरोध कायम राहील असेही महेंद्र दळवी यांनी ठामपणे सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.