Uddhav Thackeray, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
कोकण

Mahayuti Rally in Ratnagiri : रत्नागिरीतील महायुतीचा मेळावा अजित पवारांच्या अडचणीचा?

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri Political News :

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक आणि मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं आणि खासकरून महायुतीचं बळ वाढलं आहे. त्यातच उद्या रत्नागिरीत महायुतीचा मेळावा आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचा आनंद आणि आत्मविश्वास अधिक वाढला आहे. पण नेमकी एक अडचण उभी राहिली आहे. ही अडचण आहे अजित पवारांची. (Ajit Pawar)

भाजप (BJP), एकनाथ शिंदेंची शिवसेना (ShivSena) आणि अजित पवार (NCP) यांची राष्ट्रवादी या महायुतीचा उद्या (रविवारी) रत्नागिरीत मेळावा होणार आहे. याचा तिन्ही पक्षांकडून आढावा घेतला जात आहे. या मेळाव्यात महायुतीकडून उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला जाणार आहे. मात्र, यात अजित पवारांची अडचण होण्याची शक्यता आहे. कारण दापोली नगरपंचायतीत अजित पवारांचा गट ठाकरे गटासोबत सत्तेत आहे.

राज्यातील सत्ताधारी आणि दापोली नगरपंचायतीतील सत्ताकारण यात विरोधाभास असल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. त्याचवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा ठाकरे गटाबरोबरचा सत्तेतील सहभाग शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांना शह देण्यासाठीच कायम असल्याचीही चर्चा आहे.

दोन वर्षांपूर्वी दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांना शह देण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी पुढाकार घेतला आणि शिवसेना राष्ट्रवादीने आघाडी करून बाजी मारली होती. त्यावेळेला शिवसेना आघाडीच्या दोन जागा दापोलीत निवडून आल्या, तर भाजपची एक जागा आली. उर्वरित 14 जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीचा विजय झाला.

यामध्ये आठ राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सहा नगरसेवक निवडून आले. त्यावेळी नगराध्यक्ष शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष अशी सत्ता स्थापन झाली. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ममता मोरे या आता नगराध्यक्ष आहेत, तर उपनगराध्यक्षपदी अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे खालिद रखांगे आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात दीड वर्षापूर्वी शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर सहा महिन्यांपूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले. त्यानंतर दापोलीतील राष्ट्रवादीचा नगरपंचायतीमधील गट अजित पवारांसोबत गेला. प्रत्यक्षात सत्तेत मात्र हे सगळे नगरसेवक शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर सहभागी आहेत.

दापोली शहरात प्रवेश करतानाच दापोलीचे उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांचा सुनील तटकरे यांच्यासोबत स्वागताचा बॅनरही आहे. त्यामुळे दापोली नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक व उपनगराध्यक्ष हे अजित पवारांचे की राष्ट्रवादीच्या शरद पवारांचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दादांची साथ नक्की कुणाला?

श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्यानिमित्ताने अक्षता घेऊन गेलेल्या आणि त्या महिलांचा अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाकरे गटाच्या नगरसेवकाला माफी मागायला लावली होती. त्यासाठी गेल्या आठवड्यात शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी एकत्र आले होते. त्यावेळीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही पदाधिकारी अथवा नगरसेवक त्यांच्यासोबत नव्हता, यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT