Mahendra Thorve And Sunil Tatkare Sarkarnama
कोकण

Raigad Politics : शिवसेना-राष्ट्रवादी संघर्ष पेटला : थोरवेंच्या ‘सुपारी’ आरोपांवर तटकरेंचा शिलेदार संतापला; घारेंनी पत्रकार परिषद घेऊन झापलं...

Sudhakar Ghare Responds to Mahendra Thorve’s Allegation Against Sunil Tatkare : शिदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रेदशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Aslam Shanedivan

Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील संघर्षाची धार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. स्थानिक विकासकामांमध्ये हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांना धमकावल्याच्या तक्रारींमुळे दोन्ही पक्षांमधील तणाव वाढला आहे. त्यातच शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तटकरे यांनी आपल्याला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा दावा थोरवे यांनी केला होता. या आरोपांमुळे रायगडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेऊन थोरवे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मंगळवारी (ता. २७) पत्रकार परिषद घेत सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला होता. तटकरे यांना विश्वासघातकी नेता संबोधत ते ‘केसाने गळा कापण्याचे’ काम करतात, असा आरोप थोरवे यांनी केला होता. आपल्याला सुपारी देऊन मारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत, “मी मरणाला घाबरत नाही. मी जशास तसे उत्तर देईन,” असेही थोरवे म्हणाले होते.

थोरवे यांच्या या विधानामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. घारे म्हणाले की, सुनील तटकरे गेली ४५ वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. त्यांच्यावर साधी एनसीदेखील दाखल नसल्याचे त्यांनी नमूद केले. तटकरे हे संयमी नेते असून त्यांनी कधीही कोणाबद्दल अपशब्द काढलेले नाहीत. अशा नेत्यांवर सुपारी देण्याचा आरोप करणे ही खेदाची बाब असल्याचे घारे यांनी म्हटले.

‘थोरवेंची पोलिसांनी चौकशी करावी’

महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी सुधाकर घारे यांनी केली आहे. त्याचबरोबर थोरवे यांनी ‘जशास तसे उत्तर देऊ’ असा इशारा दिल्याच्या विधानाचीही पोलिसांनी दखल घ्यावी, असे घारे म्हणाले. थोरवे यांच्यावर टीका करताना घारे यांनी, “त्यांची कर्म त्यांना झोपू देत नाहीत, त्यामुळे त्यांना पोलीस बंदोबस्तात फिरण्याची वेळ आली आहे,” असा टोला लगावला.

महायुतीतील मतभेद पुन्हा चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून सुनील तटकरे यांच्यावर होत असलेल्या टीका आणि आरोपांमुळे रायगडमधील राजकीय वातावरण तापले आहे. आता सुधाकर घारे यांनीही शिवसेनेच्या आमदारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही पक्षांमधील वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. स्थानिक कामांमध्ये हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांना धमकावल्याच्या तक्रारींमुळे याआधीच दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यातच महेंद्र थोरवे यांचे गंभीर आरोप आणि सुधाकर घारे यांची प्रतिक्रिया यामुळे महायुतीतील घटक पक्षांमधील मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT