Ratnagiri News : कोकणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे आधीच राजकीय वातावरण तापले असताना आता मंडणगडच्या ४२ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या योजनेच्या श्रेयावरून तटकरे यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत खासदार सुनील तटकरे यांनी याच योजनेचे पुन्हा भूमिपूजन करत आपल्या प्रयत्नांचा पाढा वाचला. त्यामुळे मंडणगडमध्ये राजकीय श्रेयवादाला चांगलेच उधाण आले आहे.
योगेश कदमांचा तटकरे यांना अप्रत्यक्ष टोला
दोन दिवसांपूर्वी मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते मंडणगड शहराच्या ४२ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी विकासकामांचे केवळ भूमिपूजन करून चालणार नाही, तर ती प्रत्यक्षात मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो, असे म्हणत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले होते. मंडणगडची जनता सुज्ञ असून विकासकामांसाठी कोणी मेहनत घेतली, याची तिला पूर्ण जाणीव आहे. नळपाणी योजनेचे भूमिपूजन कोणीही करावे, त्याला आमच्या शुभेच्छाच आहेत. मात्र, या योजनेसाठी प्रत्यक्ष पाठपुरावा कोणी केला, हे विरोधकांनाही माहीत आहे. मेहनत करणाऱ्यांना जनता योग्य वेळी श्रेय देते, अशा शब्दांत कदम यांनी श्रेयवादावर भाष्य केले होते.
कदमांचा दावा...
मंडणगडमधील विकासकामांच्या श्रेयावरून स्थानिक राजकारण सुरू असल्याचे सांगत योगेश कदम यांनी नगरपंचायतीतील पदाधिकाऱ्यांवरही निशाणा साधला होता. नगराध्यक्षा किंवा नगरसेवकांनी नळपाणी योजनेसह अन्य विकासकामांसाठी नगरविकास मंत्र्यांकडे कोणताही पाठपुरावा केलेला नाही. आरोग्यमंत्र्यांकडेही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकदाही पाठपुरावा केला नसल्याचा दावा त्यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसैनिकांनी विकासकामांसाठी घेतलेल्या मेहनतीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर होत असल्याचा आरोपही कदम यांनी केला. केवळ भूमिपूजन करून विकासकामांचे श्रेय मिळवता येत नाही. शहरातील नागरिकांना वस्तुस्थिती माहीत असून योग्य वेळी तेच याचा निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुनील तटकरे मैदानात; दोन दिवसांत दुसऱ्यांदा भूमिपूजन
योगेश कदम यांच्या या वक्तव्यानंतर अवघ्या दोन दिवसांत खासदार सुनील तटकरे यांच्या हस्तेही याच ४२ कोटींच्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी योजनेसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देत योगेश कदम यांच्या टीकेला अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिले. केंद्र सरकारच्या अमृत २.० अभियानांतर्गत मंडणगड शहराच्या नळपाणी योजनेसाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मंडणगड शहराचा झपाट्याने विकास होत असताना नागरिकांना पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे दीर्घकाळ रखडलेली ही योजना मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केल्याचे तटकरे यांनी सांगितले.
योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यापासून तांत्रिक मान्यता मिळवण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपण प्रयत्न केले. तसेच नगरपंचायतीच्या इमारतीतून आरोग्य विभागाच्या जागेसाठी आवश्यक असलेली ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवण्यासाठीही पाठपुरावा केला. खासदार म्हणून विविध अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना देत विकासकामांचा सातत्याने आढावा घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
'पुरावे देण्याची गरज नाही'; तटकरे यांचा अप्रत्यक्ष पलटवार
या योजनेच्या श्रेयवादावर बोलताना सुनील तटकरे यांनी सावध भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुरेंद्र पवार यांच्या सहकार्याचा उल्लेख करत त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही आठवण काढली. 'या योजनेसाठी मी किती प्रयत्न केले, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे पुरावे देण्याची आवश्यकता नाही,' असे म्हणत त्यांनी योगेश कदम यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. मात्र, इतरांनी काहीच केले नाही, असे मी म्हणणार नाही, असेही स्पष्ट करत तटकरे यांनी श्रेयवादावर सावध प्रतिक्रिया दिली.
कोकणातील राजकीय संघर्ष आणखी पेटणार?
एकीकडे रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेले आरोप आणि दुसरीकडे मंडणगडच्या नळपाणी योजनेवरून योगेश कदम आणि सुनील तटकरे यांच्यात सुरू झालेला श्रेयवाद, यामुळे कोकणातील शिवसेना-राष्ट्रवादी संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांमध्येच विकासकामांच्या श्रेयावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. एकाच योजनेचे अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने दोनदा भूमिपूजन झाल्याने मंडणगडमध्ये या राजकीय संघर्षाची विशेष चर्चा रंगली आहे. आता या वादावर रामदास कदम, योगेश कदम आणि सुनील तटकरे यांच्याकडून पुढे काय प्रतिक्रिया येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.